esakal | राज्य कृती शाळा समितीमध्ये उभी फूट ! आमदार दत्तात्रय सावंतांना मोठा धक्का 
sakal

बोलून बातमी शोधा

sHIKSHAK aMDAR

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत संस्थापक - अध्यक्ष असलेल्या राज्य कृती शाळा समितीमध्ये उभी फूट पडली आहे. कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील (कोल्हापूर) यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

राज्य कृती शाळा समितीमध्ये उभी फूट ! आमदार दत्तात्रय सावंतांना मोठा धक्का 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत संस्थापक - अध्यक्ष असलेल्या राज्य कृती शाळा समितीमध्ये उभी फूट पडली आहे. कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील (कोल्हापूर) यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

श्री. पाटील हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कृती समितीमधून बाहेर पडल्याने कृती समितीचे उमेदवार आणि विद्यमान शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. कृती समितीचे अन्य पदाधिकारी देखील लवकरच बाहेर पडून महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याची माहितीही श्री.पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

मागील 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार सावंत यांना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विजयामध्ये कृती समितीचा मोठा वाटा होता. दरम्यान, सहा वर्षांमध्ये कृती समितीमध्ये नाराजी वाढल्याचे दिसून आले. त्या नाराजीतून श्री. पाटील यांनी आमदार सावंतांच्या विरोधात बंड पुकारले आहे. मागील सहा वर्षांमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघात अनेक राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

पुणे शिक्षक मतदार संघातून कॉंग्रेसने जयंत आसगावकर यांना तर पदवीधरमधून राष्ट्रवादीने अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पदवीधरमधून संग्राम देशमुख यांना तर शिक्षक मतदार संघातून जितेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष घातल्याने निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. अशातच आमदार सावंत यांच्याच कृती समितीमध्ये फूट पडल्याने श्री. सावंतांच्या अडचणी वाढल्या आहेत. 

महाविकास आघाडीचे उमेदवार आसगावकर यांच्या विजयासाठी गृहराज्य मंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागा खेचून घेण्यासाठी भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

दरम्यान, कृती समितीच्या भक्कम असलेल्या पाठिंब्यातही या निमित्ताने दुही निर्माण झाली आहे. फुटीनंतर आमदार सावंत कशा पद्धतीने आपला राजकीय डाव टाकतात, याकडेच शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे. 

मागील सहा वर्षांपूर्वी कृती समिती म्हणून आमदार सावंत यांना निवडून दिले. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले एकही वचन त्यांनी पूर्ण केले नाही. शिक्षकांचा त्यांनी विश्वासघातच केला. एकावेळी एका जिल्ह्यातील कार्यकर्त्याला संधी देण्याचे ठरलेले होते, पण त्यांनी तोही शब्द पाळला नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के आम्ही विजयी करू. 
- बाबासाहेब पाटील, 
राज्य कृती शाळा समिती कार्याध्यक्ष, कोल्हापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल