सोलापूर बंदच्या पार्श्‍वभूमिवर सोमवारी एसटीची वाहतूक बंद 

सोलापूर बंदच्या पार्श्‍वभूमिवर सोमवारी एसटीची वाहतूक बंद 

सोलापूर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्यावतीने उद्या (सोमवारी) सोलापूर शहर व जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संघटना तयारीला लागल्या आहेत. 
यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलनात 93 गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलना प्रसंगी एसटी बसेसची तोडफोड करणे, महामार्गावर टायर जाळणे यासह इतर हिंसक प्रकार केले जातात. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता सोमवारी होणाऱ्या सोलापूर शहर व जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व एसटी बसची सेवा बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये हा आदेश काढण्यात आला आहे. दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मराठा क्रांती ठोक मोर्चासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री भरणे यांना घेराव घालत आरक्षणाची गरज पटवून दिली. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांनी स्वतः च्या रक्तांनी निवेदन तयार करून पालकमंत्री भरणे यांना दिले. मराठा आरक्षणाची स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने प्रयत्न करावेत, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकर भरती करु नये अशी मागणी करण्यात आली. भरती केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक राम जाधव, समन्वयक किरण पवार, ओम घाडगे आदी उपस्थित होते. 

जुळे सोलापुरातील समाज डी-मार्टसमोर एकत्रित येणार 
मराठा आरक्षणाची स्थगिती उठवावी यासाठी सोमवारी (ता. 21) सोलापूर शहर व जिल्हा बंदची घोषणा करण्यात आली आहे. आमदार व खासदारांच्या घरासमोर हालगीनाद, कोरडे ओढो आंदोलन करण्यात येणार आहे. हद्दवाढ भागातील मराठा समाज सोमवारी सकाळी 10 वाजता डी-मार्टसमोर एकत्रित जमणार आहे. तेथून आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी रवाना होणार आहे. याबाबतचा निर्णय आज सायंकाळी मयुर मंगाल कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी संयोजक शाम कदम, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, दत्ता मुळे, रवि मोहिते, श्रीकांत डांगे, जी. के. देशमुख, उज्वला साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जीवन यादव यांनी केले. सुत्रसंचलन हणुमंत पवार यांनी केले. आभार चेतन चौधरी यांनी मानले. यावेळी बबन माने, सदाशिव पवार, आर. पी. पाटील, आजिनाथ पवार, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंके, अरुण साठे, लहु गायकवाड, विकास कदम, विशाल ताकमोगे, गजानन जमदाडे, प्रकाश डांगे, अविनाश फडतरे उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com