अखेर आसरा पुलावरील खड्डे बुजवण्यास सुरवात 

श्‍याम जोशी 
Sunday, 22 November 2020

खड्डे बुजवण्यासाठी अनेक वेळा खर्च करण्यापेक्षा एकदाच चांगल्या पध्दतीने काम केल्यास येथील समस्या सुटण्यास मदत होणार असे "सकाळ' ने बातम्यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. त्यामुळे "देर आए दुरूस्त आए' यानुसार उशीरा का होईना खडीचा वापर करून खड्डे बुजवण्यास आज सुरवात झाली आहे.

दक्षिण सोलापूर ः आसरा पुलावरील जीवघेण्या खड्डयांच्या दुरूस्तीच्या प्रतिक्षेत जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या दुचाकीधारकांना थोडासा दिलासा मिळाला. महापालिकेला आसरा रेल्वे पुलावरील खड्डे दुरूस्तीला आज अखेर मुहूर्त सापडला. दुरूस्तीच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी झाली तरी ती सुसह्य होती. 

धर्मवीर संभाजी तलावाजवळील रेल्वे पुलाखालून ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम अद्यापही न संपल्याने विजापूरकडे जाणारी जड व अन्य वाहतूक आसरा पुलावरून सुरू आहे. एक महिना झाला तरी ड्रेनेजलाईनचे काम संपता संपत नसल्याने आसरा पुलावरून होणारी वाहतूक वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातून पुलाची क्षमता न तपासताच जडवाहतूक सुरू करून प्रशासनाने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकले. 

पुलावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक वैतागले होते. अनेक संघटनांनी त्या बाबत आंदोलन केले. खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी महापौर, आयुक्त व अधिकारी यांनी पुलाची पाहणी करून तत्काळ दुरूस्तीसह पर्यायी मार्ग करण्याची सूचनाही केली. परंतू प्रशासन ठिम्मच होते. महापालिकेने तात्पुरती डागडुजी करत खड्डे बुजवण्यासाठी मुरूमाची माती टाकली. त्यामुळे वेगळीच समस्या उदभवली अन्‌ पुलावर नुसते धुळीचे लोट उठले. वाहनधारकांसह परिसरातील दुकानदार व रहिवाशी अधिकच वैतागले. माध्यमांनी ओरड करताच महापालिकेला जाग आली. त्यांनी लगबगीने खडीमिश्रित डांबर वापरून हे खड्डे बुजवले परंतु तिथेही महापालिकेचे गणित कच्चेच ठरले. खड्डे अधिक अन्‌ डांबर कमीच पडले. त्यामुळे काही खड्डे बुजले तर उर्वरीत खड्डेच तसेच राहिले. त्यातून पावसामुळे डांबर वाहून गेल्याने पुन्हा हे खड्डे उघडे पडले. 

सोलापूर शहरात महापालिका आहे की ग्रामपंचायत असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त झाला. कर आकारणी महापालिका नियमानुसार अन्‌ सुविधा मात्र ग्रामपंचायतीच्या सुध्दा दर्जाच्या नाहीत अशी स्थिती झाली. खड्डे बुजवताना ते व्यवस्थित काम झाले पाहिजे याकडे प्रशानातील अधिकारी किंवा नगरसेवकांचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसले. खड्डे बुजवण्यासाठी अनेक वेळा खर्च करण्यापेक्षा एकदाच चांगल्या पध्दतीने काम केल्यास येथील समस्या सुटण्यास मदत होणार असे "सकाळ' ने बातम्यांच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. त्यामुळे "देर आए दुरूस्त आए' यानुसार उशीरा का होईना खडीचा वापर करून खड्डे बुजवण्यास आज सुरवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह रहिवाशांतून अल्प का होईना पण दिलासा मिळाला आहे. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start on the pits on the Asara bridge began