राज्य सरकारची अनलॉककडे वाटचाल; माळशिरस तहसील कार्यालय मात्र 'लॉक' 

प्रदीप बोरावके 
Tuesday, 15 September 2020

तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंग करून त्यांची ऑक्‍सिजन पातळी तपासूनच कार्यालयात प्रवेश द्यायला हवा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कामकाज असे बंद ठेवून नागरिकांचा किती दिवस खोळंबा करणार, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. 

माळीनगर (सोलापूर) : माळशिरस तहसील कार्यालयात कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याने तहसील कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. तेथील कामकाज बंद असल्याने नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व अन्य कामासाठी अडचणी येत आहेत. तहसील प्रशासनाने नागरिकांच्या विविध कामासाठी किमान एक खिडकी तरी सुरू ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 
विद्यार्थ्यांच्या जेईई, नीट परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेले जातीचे दाखले, नॉनक्रिमीलेअर सर्टिफिकेट, केंद्रीय जातीचा दाखले काढण्यासाठी पालकांची धावपळ सुरू आहे. रेशनकार्ड काढण्यासाठी नागरिक व विविध कामासाठी शेतकरी तहसील कार्यालयात धाव घेत आहेत. 10 सप्टेंबरला तहसील कार्यालयात कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याने पुढील आदेश येईपर्यंत ते बंद राहील, असे पत्रक कार्यालयाच्या दर्शनी भागात चिकटविण्यात आले आहे. त्यावर तहसीलदारांची सही अथवा शिक्का तसेच हे पत्रक कोणाच्या आदेशानुसार काढले, याबाबतची माहिती त्यावर नाही. कार्यालय कधी सुरू होणार याचा पत्रकावर उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना तहसील कार्यालय बंद असल्याची कल्पना नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, नागरिक, शेतकरी यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे आर्थिक भुर्दंडाबरोबरच त्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. 
तहसील कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले न मिळाल्यास व त्यांना त्यामुळे पुढील प्रवेशापासून वंचित राहावे लागल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. केंद्र असो की राज्य सरकार, दोन्हींची लॉकडाउनकडून अनलॉककडे वाटचाल सुरू आहे. मात्र, कोरोनाबाधित व्यक्तीमुळे तहसीलसारखे प्रमुख शासकीय कार्यालय बंद ठेवण्याचा प्रकार नागरिकांना अजबच वाटत आहे. वास्तविक, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझेशन व थर्मल स्क्रिनिंग करून त्यांची ऑक्‍सिजन पातळी तपासूनच कार्यालयात प्रवेश द्यायला हवा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कामकाज असे बंद ठेवून नागरिकांचा किती दिवस खोळंबा करणार, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State governments move towards unlock Malshiras tehsil office is locked