प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख : पंधरा दिवसात मिळेल सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकला नवा अध्यक्ष 

प्रमोद बोडके
Sunday, 11 October 2020

भोसे येथील ऍड. गणेश पाटील यांची शक्‍यता 
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन अध्यक्षांच्या कालावधीत सोलापूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या 11 तालुका पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या निवडीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाले आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पाटील परिवाराची भोसे (ता. पंढरपूर) येथे जाऊन भेट घेतली होती. या कुटुंबाच्या पाठीशी आपण कायमस्वरुपी राहू असा विश्‍वासही त्यांनी दिला होता. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी कै. राजूबापू पाटील यांचे चिरंजीव व भोसे येथील उपसरपंच ऍड. गणेश पाटील हे देखील इच्छुक आहेत. युवक जिल्हाध्यक्षपदावर गणेश पाटील यांची निवड होण्याची दाट शक्‍यता आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आज सोलापुरातील शासकिय विश्रामगृहात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना येत्या दोन दिवसांमध्ये सादर केला जाईल. साधारण: येत्या 15 दिवसांमध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवीन अध्यक्ष मिळेल अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिली. 

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत माने यांच्या ठिकाणी नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने यापूर्वीच इच्छुकांकडून अर्ज मागणी केली होती. त्यानूसार सोलापूर जिल्ह्यातील सात जणांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये करमाळ्यातील प्रताप जगताप व अभिषेक आव्हाड, पंढरपूर तालुक्‍यातील विकास शिंदे, संदीप मांडवे, गणेश पाटील, अरुण आसबे, सोलापुरातील प्रशांत बाबर यांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर केलेल्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती आज प्रदेशाध्यक्ष शेख यांनी घेतल्या आहेत. त्यासाठी ते आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. उस्मानाबाद येथील आढावा बैठक संपून दुपारी 4 च्या दरम्यान शेख यांचे सोलापुरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीसोबतच सोलापूर शहर व जिलहा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केलेल्या कामकाजाचाही आढावा त्यांनी घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State President Mahboob Sheikh: In a fortnight, Solapur district NCP youth will get a new president