अरेव्वा ! तंत्रस्नेही विद्यार्थिनी बनल्या ऑनलाइन शिक्षिका ! 800 मुलींनी घेतला सहभाग

श्रीनिवास दुध्याल 
Tuesday, 8 September 2020

ऑनलाइन शिक्षण घेत अगदी तीन महिन्यांच्या अनुभवातून येथील सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या मुलींनी शिक्षणासाठी मोबाईल हाताळण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. तंत्रस्नेही झालेल्या मुलींनी शिक्षक दिनानिमित्त पाठ्यपुस्तकातील गद्य, पद्य, गणिते, विज्ञान हे विषय आपल्या आकलनशक्तीप्रमाणे इतर मुलींना समजावून सांगितले. 

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात वीस मुलींनी ऑनलाइन तास घेऊन शिक्षिकांची भूमिका बजावली. या ऑनलाइन तासाला जवळपास 800 मुलींनी सहभागी होत अध्ययन केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थी नेहमीच शिक्षकांचे अनुकरण करतात. ऑनलाइन शिक्षण घेत अगदी तीन महिन्यांच्या अनुभवातून मुलींनी शिक्षणासाठी मोबाईल हाताळण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. तंत्रस्नेही झालेल्या मुलींनी शिक्षक दिनानिमित्त पाठ्यपुस्तकातील गद्य, पद्य, गणिते, विज्ञान हे विषय आपल्या आकलनशक्तीप्रमाणे इतर मुलींना समजावून सांगितले. या वेळी त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याचे दिसून आले. 

शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी पुल्ली कन्या प्रशालेत विद्यार्थिनी दिवस साजरा केला जातो. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी एका दिवसासाठी शिक्षिका होऊन इयत्ता पाचवी ते नववीच्या वर्गावर तास घेतात. हा अनुभव मुलींसाठी अविस्मरणीय ठरतो. यंदा शाळा बंद असली तरी मुलींना हा अनुभव घेण्याची संधी द्यायची, या उद्देशाने ऑनलाइन तास घेण्याची संधी मुख्याध्यापिका गीता सादूल यांनी दिली. गौरी मल्लाबादे, सानिका देवकर, श्रावणी कोळी, प्रीती सोमा, प्रत्युषा दासरी, नेहा चौगुले, सुजाता नकाशे, नंदिनी जमादार, अखिला श्रीगण आणि धनश्री स्वामी या दहावीच्या विद्यार्थिनींनी पाचवी ते नववीच्या सर्व वर्गांवर भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक अभ्यास या विषयांचे अध्यापन करीत शिक्षक होण्याचा अनुभव घेतला. 

तासाची सुरवात प्रार्थनेने केली. विद्यार्थिनींनी विचारलेल्या शंकांचे समाधानही त्यांनी या वेळी केले. पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींनी आपल्या मोठ्या ताईंनी घेतलेल्या तासाला उत्तम प्रतिसाद देऊन ताईंचे कौतुक देखील केले. हा अविस्मरणीय अनुभव ठरला. हा ऑनलाइन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका गीता सादूल, उपमुख्याध्यापक युवराज मेटे, पर्यवेक्षिका कल्पना येमूल यांच्यासह दहावीचे वर्गशिक्षक आशिष मिसाळ, ज्योत्स्ना रणदिवे, अश्विनी दास, उमा कोटा, लक्ष्मी कोंडा यांनी मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The students of Pulli Kanya School became online teachers