दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम ! शाळांची घंटा वाजली, पहिल्या दिवशी चांगली उपस्थिती 

राजाराम माने 
Wednesday, 27 January 2021

करमाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नेताजी सुभाष विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, सुरवातीला विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन त्याचे पालन करण्यास सांगितले. विद्यालयात 410 विद्यार्थी संख्या असून त्यापैकी पहिल्याच दिवशी 290 विद्यार्थी उपस्थित होते. 

केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवार (ता. 27) पासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवल्याने, कोरोना नियमांचे पालन करत करमाळा तालुक्‍यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिल्यानंतर श्री. ठाकरे यांनी कोरोना संदर्भातील सर्व उपाययोजना अंमलात आणून व सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी 23 नोव्हेंबरपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग देखील प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर व मोठ्या सुटीनंतर विद्यार्थी आपले वर्ग मित्र- मैत्रिणी आणि शिक्षकांना भेटले आहेत. 

करमाळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील नेताजी सुभाष विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, सुरवातीला विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या वेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन त्याचे पालन करण्यास सांगितले. विद्यालयात 410 विद्यार्थी संख्या असून त्यापैकी पहिल्याच दिवशी 290 विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुशी व उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. काही पालकही विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळेत आले होते. 

शैक्षणिक ऋतुचक्र मात्र बदलले 
पाऊस लांबला की, शेती हंगामाचे संपूर्ण वर्षाचे गणित बिघडते, तसाच प्रकार कोरोना महामारीच्या संकटामुळे शैक्षणिक ऋतुचक्रावरही झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी बारावीची परीक्षा यावर्षी 23 एप्रिल रोजी तर दहावीची मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणारी परीक्षा 29 एप्रिलला सुरू होणार असल्याने या परीक्षांचे निकालही त्यामुळे लांबणीवर पडणार आहेत. कोरोनामुळे नव्या वर्षातील शैक्षणिक ऋतुचक्र अशाप्रकारे बदललेले दिसेल. दरम्यान, शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेला असल्याचे या वेळी दिसून आले. 

शालेय शिक्षण विभागाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची संख्या निश्‍चितच हळूहळू वाढवून शाळा पूर्ववत सुरू होतील. 
- डी. बी. शिंदे, 
प्राचार्य, नेताजी सुभाष विद्यालय व महाविद्यालय, केत्तूर 

दहा महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीनंतर आज शाळा सुरू झाल्याने वर्गमित्र - मैत्रिणी भेटल्याचा आनंद झाला आहे. आता विद्यार्थी व शिक्षकांचा पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष संवाद सुरू होईल. 
- राधिका माने, 
विद्यार्थिनी, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The students were overjoyed when the school started today after ten months