बुडणाऱ्या दोन सुनांपैकी एकीला वाचवण्यात यश; माळशिरस तालुक्‍यातील घटना 

अशोक पवार 
Friday, 30 October 2020

वेळापूर (ता. माळशिरस) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पाय घसरून बुडणाऱ्या दोन सुनांपैकी एका सुनेला वाचविण्यात सासूला यश आले. परंतु, दुसरी सून सोनाली राजेंद्र चव्हाण यांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

वेळापूर (सोलापूर) : वेळापूर (ता. माळशिरस) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात पाय घसरून बुडणाऱ्या दोन सुनांपैकी एका सुनेला वाचविण्यात सासूला यश आले. परंतु, दुसरी सून सोनाली राजेंद्र चव्हाण यांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. 
वेळापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार (ता. 29) सकाळी दहा वाजता मोनाली राजेंद्र चव्हाण (वय 25) व त्यांची चुलत जाऊ काजल गजानन चव्हाण या दोघी (रा. वेळापूर) या कपडे धुण्यासाठी वेळापूर गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सांगोला रस्त्याच्या बाजूला असलेल्या डी फोर कालव्या शेजारील तलावावर गेल्या होत्या. काजल या पाण्यात उतरून पाणी घेत असताना पाय घसरून पाण्यात पडल्या व बुडू लागल्या. जावेला वाचविण्यासाठी मोनाली प्रयत्न करत असताना तळ्यांमधील शेवाळावरून पाय घसरून त्याही पाण्यात पडल्या. तळ्याच्या काठावर असलेली सोनाली यांची मुलगी आरडाओरडा करू लागल्याने सासूने पळत येऊन काठाजवळ पाण्यातील काजल चव्हाण हिस हात देऊन ओढून घेतले व त्यांना वाचवले. परंतु मोनाली या तलावातील पाण्यात आत गेल्याने त्यांना वाचवता आले नाही. त्यानंतर आजूबाजूचे व गावातील लोक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी तळ्यामध्ये बुडालेल्या मोनाली यांना वर काढले. परंतु तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. वेळापूर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती मयत महिलेचे दीर विकास ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. तपास पोलीस हवालदार अनिल बनसोडे हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in rescuing one of the two drowning women incident in Malshiras taluka