एका पावसाने मिळाली जीवनास कलाटणी ! लिंबोळ्या वेचण्याचे सोडून शाळा शिकलो म्हणून आज आयएएस झालो 

Avinash Jadhavar
Avinash Jadhavar

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : लहानपणी प्रत्येकालाच नकोशी वाटणारी शाळा नंतर हवीहवीशी वाटते. आयुष्याची जडणघडण लहान वयात या शाळेतूनच होते. येथूनच खऱ्या ध्येयाचा पाठलाग सुरू होतो. जर आपण शाळा चांगली शिकलो असतो तर चांगल्या नोकरीला लागलो असतो, असे आयुष्यात अपयश आलेल्यांना कित्येकदा वाटते. आता वेळ निघून गेलेली आहे. त्या वेळी योग्य वेळी निर्णय घेतला नाही म्हणून आज पश्‍चात्ताप होत आहे, असेही अनेकजण सांगतात. अशीच काही सांगण्याची वेळ एका युवकावर आली असती; परंतु एका पावसाने या युवकाच्या आयुष्याला कलाटणी दिली. लहानपणी शाळा सोडून शेतात लिंबोळ्या वेचण्यासाठी गेलेल्या मुलाला एका पावसाने आयुष्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. आज तो युवक "लिंबोळ्या वेचण्याचे सोडून शाळा शिकलो म्हणून आज आयएएस झालो' असे अभिमानाने सांगत आहे. बार्शी तालुक्‍यातील चुंब या गावातील अविनाश भीमराव जाधवर यांची ही प्रेरणादायी कहाणी. 

बालाघाटच्या कुशीत वसलेले बार्शी तालुक्‍यातील चुंब हे गाव. अविनाश जाधवर यांच्या घरची परिस्थिती हलाखीची. आईवडील शेतकरी असल्याने सर्व कुटुंबाची उपजीविका शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून असायची. परंतु शेती ही बेभरवशाची असायची, तरीदेखील त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीच्या कामात बारा महिने काबाडकष्ट करत असायचे. आर्थिक उत्पन्नासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय करायचा झाल्यास गावात त्या काळी कडुनिंबाच्या लिंबोळ्या वेचून ते विकून त्यातून येणाऱ्या रकमेतून घरात हातभार लागायचा. अविनाश हे मित्र व भावंडांसोबत शाळा सोडून दिवसभर रानावनात कडुनिंबाच्या लिंबोळ्या वेचण्यासाठी जात असत. 

असेच एकदा लिंबोळ्या वेचण्यासाठी शेतात गेले असता, अचानक आलेल्या मोठ्या वादळी वारा व पावसामुळे अविनाश व त्यांच्या मित्रांची चांगलीच धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे त्यांना कुठे आडोसा भेटला नाही. पावसापासून संरक्षण करण्यासाठी ना रेनकोट, ना छत्री होती. पावसाने त्यांना चांगलेच झोडपून काढले होते. त्या वेळी त्यांच्या मनात सहज विचार येऊन गेला, की आज जर या वेळेला मी शाळेत असलो असतो, तर या पावसात भिजण्याची वेळ माझ्यावर आली नसती. मी जर शाळा सोडून असाच लिंबोळ्या वेचत राहिलो, तर यापेक्षाही अनेक भयानक संकटांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आपली शाळाच बरी. चांगले शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरीस लागू, अशी इच्छा मनी बाळगून तेव्हापासून त्यांनी शाळेत जाण्यात सातत्य राखले. 

अविनाश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण भगवान बाबा विद्यालयात झाले. हे शिक्षण घेत असताना देखील शेतातील कामे करणे हे नित्याचेच ठरलेले होते. त्यामुळे रोज सकाळी दहा वाजेपर्यंत शेतातील नांगरणी करणे, गुरे चारणे अशी विविध कामे करून ते शाळा गाठत असत. हे सर्व करत त्यांना शाळेचे महत्त्व पटल्याने शेतातच जनावरे राखत अभ्यास करत. त्यांच्या प्रयत्नाला दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने पहिले यश मिळाले. पुढे त्यांचे शिक्षण बार्शी येथील भाऊसाहेब झाडबुके या महाविद्यालयात झाले. येथे त्यांचा द्वितीय क्रमांक आला. बारावी झाल्यानंतर वडिलांची व अविनाश यांची एमबीबीएससाठी खूप धडपड होती. वडिलांची तर मुलाने डॉक्‍टर व्हावे म्हणून प्रबळ इच्छा होती. परंतु घरच्या परिस्थितीचा विचार करता हे शक्‍य नव्हते. त्यामुळे मोठ्या भावाने बीएस्सी ऍग्री करून स्पर्धा परीक्षा करण्याचा सल्ला दिला. 

घरची परिस्थिती बेताची असतानादेखील वडिलांनी व मोठ्या भावाने अविनाश यांच्यावर मोठा विश्वास दाखवल्याने त्यांनी पूर्ण जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेचा अभ्यास सुरू केला. इंग्रजी थोडे कच्चे असतानादेखील इंग्रजी या विषयातून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा यशाने हुलकावणी दिली. परंतु अविनाश हे खचून जाणारे नव्हते. लहानपणीच्या लिंबोळ्या वेचत असतानाचा आलेला अनुभव सतत त्यांच्या डोळ्यासमोर असायचा. त्यामुळे काहीही झाले तरी आपण अधिकारी झालेच पाहिजे, असे त्यांना वाटते असे. त्यामुळे पहिल्या दोन अपयशानंतर देखील त्यांनी पुन्हा त्याच जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आयएएस या पदाला गवसणी घातली आहे. "जर शाळा सोडून लिंबोळ्या वेचत राहिलो असतो, तर आज या पदापर्यंत पोचलो नसतो. त्या वेळी घेतलेला निर्णय आज माझ्या जीवनास सार्थकी लागला आहे', असे ते सांगतात. सामान्य कुटुंबातील एक मुलगा आज आयएएस झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा हा प्रवास नक्कीच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com