सर्वांना वाटायचे खेळामुळे वाया जातो की काय ! मात्र, सर्वांना खोटे ठरवत आज ते आहेत पोलिस उपअधीक्षक

अक्षय गुंड 
Monday, 26 October 2020

खेळाचे महत्त्व समजलेल्या ग्रामीण भागातील एका युवकाने शाळेतील शिक्षकांच्या तासांना दांडी मारत क्रीडा स्पर्धेवर भर दिला. त्यामुळे राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळण्याची संधी मिळाली. क्रीडा स्पर्धेमुळे शाळेत गैरहजर राहणाऱ्या या युवकाचे करिअर खराब होते की काय? असे वाटत असताना, या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत क्रीडा स्पर्धेच्या जोरावर पहिल्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : आपल्याकडे खेळाला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. खेळ म्हणजे अभ्यासातून वेळ काढून मनावरचा ताण दूर करण्याचे साधन समजले जाते. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने खेळाचे पाहिजे तितके महत्त्व ग्रामीण भागात अद्याप पोचलेले नाही. परंतु, खेळाचे महत्त्व समजलेल्या ग्रामीण भागातील एका युवकाने शाळेतील शिक्षकांच्या तासांना दांडी मारत क्रीडा स्पर्धेवर भर दिला. त्यामुळे राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळण्याची संधी मिळाली. क्रीडा स्पर्धेमुळे शाळेत गैरहजर राहणाऱ्या या युवकाचे करिअर खराब होते की काय? असे वाटत असताना, या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत क्रीडा स्पर्धेच्या जोरावरच पहिल्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. क्रीडा क्षेत्रामुळे शासकीय सेवेत गरुडभरारी घेणाऱ्या इंदापूर तालुक्‍यातील कालठण नंबर एक या गावचे सुपुत्र राहुल ज्ञानदेव मदने यांची ही कहाणी. 

"गोळाफेक म्हणजे राहुल व राहुल म्हणजे गोळाफेक !' 
राहुल मदने यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण फलटण येथे झाले. त्यानंतर बीएस्सी ऍग्रिकल्चर या शिक्षणासाठी पुणे येथे प्रवेश घेतला. राहुल यांना लहानपणापासूनच मैदानी स्पर्धेचे जाम आकर्षण व आवड होती. गोळाफेक या क्रीडा प्रकारात शाळेतच नव्हे तर तालुक्‍यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. शालेय वयातच त्यांनी या स्पर्धेत तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले होते. त्यामुळे "शाळेत गोळाफेक म्हणजे राहुल मदने व राहुल मदने म्हणजेच गोळाफेक' असे समीकरण तयार झाले होते. वडील पेशाने शिक्षक; परंतु मल्लखांब असल्याने त्यांना क्रीडा स्पर्धेबद्दल खूपच कौतुक वाटत असे. त्यामुळे त्यांना राहुल यांच्या क्रीडा स्पर्धेतील यशाचेही कौतुक वाटत असे. 

अनेकांना वाटायची राहुल यांच्या भविष्याची चिंता 
राहुल यांना गोळाफेक व क्रीडा स्पर्धेचे एवढे वेड लागले होते, की परिणामी ते शाळेतील तासांना दांडी मारत मैदानावर सतत हजर असत. त्यामुळे शाळेतील उपस्थितीबाबत त्यांची सतत तक्रार असे. गोळाफेकमधून काय करिअर होत असते का? असे वाटत असल्याने, अनेकांना तर राहुल यांच्या भविष्याची चिंता वाटत असे. परंतु गोळाफेक या स्पर्धेपुढे कुणाच्याही विचारांची कसलीही तमा न बाळगता त्यांचे काम सुरू होते. स्पर्धेच्या या युगात काहीतरी नावीन्यपूर्ण व गावात कुणालाही आतापर्यंत शक्‍य झाले नाही असे काहीतरी यश मिळवायचे, असा त्यांचा निर्णय ठाम होता. 

गोळाफेकच्या स्पर्धेमुळे पदवीच्या पहिल्या वर्षातच पाच विषयांत नापास 
पुढे ते उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेले. परंतु गोळाफेक या स्पर्धेपासून कधीही अलिप्त राहिले नाहीत. याचाच भाग म्हणून पदवीच्या पहिल्या वर्षाला गोळाफेक या स्पर्धेमुळे बाहेरगावी खेळण्यासाठी गेल्याने 7 पैकी 5 विषयांत नापास झाले होते. परंतु त्यांनी गोळाफेकचा नाद काही सोडला नाही. ते राष्ट्रीय स्तरावर खेळले असल्याने, पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना त्यांना काही दिवसांसाठी राहुरी येथे गोळाफेकचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवण्यात आले होते. 

शिक्षक म्हणायचे, कॉलेज करत नाहीस, कसे व्हायचे तुझे? 
राहुरी येथील स्पर्धात्मक वातावरणात अनुभवी शिक्षक व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांचा सहवास लाभल्याने आपणही पोलिस उपनिरीक्षक व्हावे, असे मनोमन त्यांना वाटू लागले. त्यामुळे राहुरी येथून पुणे येथे शिक्षणासाठी माघारी आले असता, त्यांनी पूर्ण जिद्दीने व आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यामुळे कॉलेजला देखील जाणे त्यांचे बरेचसे बंद झाले होते. आधीच क्रीडा स्पर्धेमुळे कॉलेजला दांडी असायची, त्यात आता स्पर्धा परीक्षा करायची म्हणून अभ्यास करण्यासाठी कॉलेजला जात नसल्याने शिक्षक मात्र राहुल यांच्या करिअरबाबत चिंतेत असायचे. कॉलेजला येत नसल्याचे शिक्षकांनी राहुल यांना विचारले, "कॉलेज करत नाहीस, कसे व्हायचे तुझे?' यावर "स्पर्धा परीक्षा करतोय' असे उत्तर दिले असता, शिक्षक म्हणाले "इथं कॉलेज करणं होईनाय, अन्‌ तिथे काय करणार आहेस तू?'. त्या वेळी त्यांच्याकडे उत्तर नव्हते. या काळात पहिल्या प्रयत्नात त्यांनी पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेत सहजरीत्या यश संपादन केले. परंतु, पदवीचे कोणतेही शिक्षण पूर्ण नसल्याने त्यांना पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेच्या मुलाखतीला नाकारण्यात आले. 

"गोळाफेक'नेच मिळवून दिले पोलिस उपअधीक्षकपद 
मुलाखतीला नाकारल्याचे त्यांना दुःख मुळीच नव्हते. उलट त्यांच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण झाला, की मी अजून थोडा प्रयत्न केला तर यापेक्षा मोठे यश संपादन करू शकतो. पुढे ते पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश संपादन केले. मुख्य परीक्षेपर्यंत त्यांच्याकडे आवश्‍यक असलेली पदवीही संपादन झाली होती. 2009 मध्ये त्यांनी पदवीचेही शिक्षण पूर्ण केले व अवघ्या सहा महिन्यांतच राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपअधीक्षक परीक्षेत यश संपादन केले. राहुल मदने यांना पोलिस उपअधीक्षक हे पद फक्त अन्‌ फक्त गोळाफेक या स्पर्धेतील गुणवत्तेच्या जोरावर मिळाले. कारण, या पदावर त्यांची निवड म्हणजे, त्या वेळी राज्य लोकसेवा आयोगाच्या क्रीडा कोट्यातून पोलिस उपअधीक्षक पदासाठी एकच जागा रिक्त होती व राहुल मदने हे गोळाफेकमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलेले असल्याने, त्या गुणांच्या आधारे त्यांना पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते सध्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा स्पर्धेतील गुण त्यांच्याजवळ नसते तर त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली असती. 

क्रीडा क्षेत्रातून प्रशासकीय क्षेत्रात गरुडभरारी ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी 
राहुल मदने हे कालठण नंबर एक या गावातील पहिलेच अधिकारी आहेत. त्यांची एक बहीण शिक्षिका असून दुसरी बहीण सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी कार्यरत आहे. त्यादेखील उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. त्यांच्या यशात क्रीडाशिक्षक पी. टी. जाधव, बाळकृष्ण नानेकर, नीलेश नलावडे, अमोल झेंडे व राहुरी कृषी एकता मंच यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. एकंदरीत, घरातील क्रीडामय वातावरणामुळे, क्रीडा क्षेत्रातून प्रशासकीय क्षेत्रात राहुल मदने यांनी घेतलेली गरुडभरारी ही ग्रामीण भागातील युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story of Deputy Superintendent of Police Rahul Madane