लहान भाऊ म्हणाला, "दादा, तुला काय शिकायचंय ते शिक, मी हवे तेवढे पैसे पुरवितो !' मोठा भाऊ "एमएस'मध्ये राज्यात पहिला

सूर्यकांत बनकर 
Friday, 2 October 2020

पदव्युत्तर पदवी घेण्याची प्रबळ इच्छा... पण घरच्या परिस्थितीमुळे वैद्यकीय व्यवसाय चालू करण्याचा निर्णय... पण लहान भाऊ म्हणतो, "दादा, तुला काय शिकायचंय ते शिक, मी पाहिजे तेवढे पैसे पुरवितो.' लहान भावाच्या जिवावार मोठ्या भावाचा पुढील शिक्षणाचा प्रवास... एकच वर्षात सीईटीमध्ये देशात तिसरा आणि पुढे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून "एमएस' परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक! ही प्रेरणादायी कहाणी आहे आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील डॉ. अमोल शिवाजी चव्हाण यांची! 

करकंब (सोलापूर) : घरी तीन एकर जिरायती शेती... वर्षभराची शिदोरी भागेल एवढ्याही उत्पन्नाची हमी नाही... लहान भावाचा मेडिकल दुकानात काम करून घराला हातभार... शिवाय मोठ्या भावाच्या वैद्यकीय शिक्षणासही मदत... अशातच मोठ्या भावास एमबीबीएस आणि त्यानंतर अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून पदविका प्राप्त... पदव्युत्तर पदवी घेण्याची प्रबळ इच्छा... पण घरच्या परिस्थितीमुळे वैद्यकीय व्यवसाय चालू करण्याचा निर्णय... पण लहान भाऊ म्हणतो, "दादा, तुला काय शिकायचंय ते शिक, मी पाहिजे तेवढे पैसे पुरवितो.' लहान भावाच्या जिवावार मोठ्या भावाचा पुढील शिक्षणाचा प्रवास... एकच वर्षात सीईटीमध्ये देशात तिसरा आणि पुढे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून "एमएस' परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक! ही प्रेरणादायी कहाणी आहे आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील डॉ. अमोल शिवाजी चव्हाण यांची! 

डॉ. अमोल चव्हाण यांचा एमएस (आर्थो) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचा पंढरपूर येथे कर्नल हरी बोंगे यांच्या हस्ते हृद्य सन्मान करण्यात आला. त्या वेळी "माझा भाऊ लहान असूनसुद्धा तो मोठा झाला म्हणून मी हे यश संपादन करू शकलो', हे सांगताना डॉ. चव्हाण यांना अश्रू अनावर झाले. त्यांची संघर्षकथा ऐकताना उपस्थित सर्वांनाच अश्रू आवरणे कठीण झाले होते. 

तलाठी म्हणून सेवेत असणाऱ्या वडिलांनी 1995 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन दत्ता भाकरे यांच्या साथीने ठेकेदारी चालू केली. पण 1999 मध्ये दत्ता भाकरे यांचे दुर्दैवी निधन झाले आणि वडिलांची ठेकेदारीही बंद झाली. आणि तेथूनच चालू झाली चव्हाण कुटुंबीयांची जगण्याची लढाई! तरीही माता-पित्यांनी काबाडकष्ट करून मोठा मुलगा अमोल यास एमबीबीएस तर लहान मुलगा अजिंक्‍य यास डी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण दिले. अमोलने घरच्या बिकट परिस्थितीमुळे दुसऱ्याच्या मेडिकल दुकानात काम करणे पसंत केले. त्याच वेळी अमोलनेही जिद्दीने अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून पदविका मिळविली. या वेळी अमोलने पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असून देखील घरच्या परिस्थितीमुळे वैद्यकीय व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला. नेमक्‍या याच वेळी लहान भाऊ अजिंक्‍य हा मोठा भाऊ बनून पुढे आला. 

त्याने "घरच्या परिस्थितीचा विचार न करता पुढील जेवढे शिक्षण घ्यायचे आहे तेवढे घे. मी तुला पैसे कमी पडू देणार नाही', असे सांगितले. आई-वडिलांनीही अजून जास्त काबाडकष्ट करण्याची तयारी दाखवत पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिली. तेव्हा अमोलने औरंगाबाद येथे एक वर्ष राहून सीईटीच्या परीक्षेची तयारी केली. विशेष म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तो एप्रिलमध्ये देशात तिसरा आला. त्यानंतर मुंबई येथील नामांकित केईएम रुग्णालयात प्रवेश मिळाल्यानंतर गेल्या दोन वर्षातील अथक परिश्रमानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या एमएस (आर्थो.) परीक्षेच्या अंतिम निकालात ते राज्यात प्रथम आले आहेत. 

आपल्या कुटुंबाने घेतलेल्या काबाडकष्टाची माहिती देताना डॉ. अमोल चव्हाण यांना प्रत्येक वाक्‍यागणिक हुंदका अनावर होत होता. दरम्यान, 6 जुलै 2019 रोजी विवाहबद्ध होताना प्राथमिक शिक्षक ज्योतिराम बोंगे यांची जिद्दी कन्या डॉ. अमृताही त्यांना आयुष्याची जोडीदारीण म्हणून लाभली आहे. त्यांचीही वाटचाल आपल्या पतीच्याच पावलावर पाऊल ठेवून चालू आहे. डॉ. चव्हाण यांचा एक मेव्हणा विश्वास हा युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेतोय तर दुसरा मेव्हणा मोरेश्वर याने नुकतीच सीईटी दिली असून, तोही यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करतोय. 

डॉ. अमोल चव्हाण यांनी अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून पुढे येत सर्वांपुढे एक नवा आदर्श ठेवला असून, त्यांच्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, अशा भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story : With the help of younger brother, elder brother Amol became a doctor