वडिलांनी म्हटलं होतं, "तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर..!' 

Ramdas Kokare
Ramdas Kokare

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : उजनी धरणाच्या पट्ट्यातील पुनर्वसन झालेले गाव रिटेवाडी. गावातील समस्या लहानपणापासून जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे आपण काहीतरी चांगले केले तरच गावाच्या विकासासाठी हातभार लागू शकतो व पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकते, हे त्यांना चांगलेच समजले होते. गावाच्या विकासासाठी त्यांची होत असलेली धडपड पाहून गावकऱ्यांनी त्यांना सरपंचपदासाठी बिनविरोध निवडून देण्याचे ठरवलं होतं. परंतु वडिलांनी सांगितलं, "तू सरपंच झालास तर एक गाव सुधारशील पण अधिकारी झालास तर अनेक गावं सुधारशील!' वडिलांचे हे शब्द त्यांच्या मनाला भिडले. वडिलांचे हे स्वप्न साकारण्यासाठी ते अधिकारी झाले. स्वतःचा एक वेगळा पॅटर्न निर्माण केला. रामदास कोकरे असे त्यांचे नाव. 

अनवाणी पायाने शाळेला जात होते 
उजनी धरणाच्या पाण्याचे 1980च्या आसपास जलपूजन करण्यात आले, त्यामुळे या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यास सुरवात करण्यात आली. त्यामुळे या धरणाच्या पट्ट्यात असलेले करमाळा तालुक्‍यातील रिटेवाडी गावाचे पुनर्वसन झाले. गावातील लोक आपापल्या सोयीने शिल्लक राहिलेल्या शेतात व पंढरपूर तालुक्‍यात पर्यायी मिळालेल्या जागेत स्थायिक होऊ लागले. याच गावातील रामदास कोकरे यांचे कुटुंब. त्यामुळे त्यांचीही सुपीक जमीन भूसंपादित झाली होती; परंतु शिल्लक राहिलेल्या माळरानावरही त्यांची जमीन होती. त्यामुळे ते इतर ठिकाणी न जाता तेथेच स्थायिक झाले. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला मेंढरं राखणे हा व्यवसाय करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. नव्याने गावाचे पुनर्वसन झाल्याने गावातील शाळा बंद झाली होती. गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेत शाळा सुरू केली. पण शाळेत जाणारी मुलांची संख्या नगण्य होती. पहिलीच्या वर्गात रामदास कोकरे यांनी प्रवेश केला. परंतु दुसऱ्या इयत्तेत विद्यार्थी नसल्याने शिक्षकांनी रामदास यांना दुसरीच्या वर्गात प्रवेश घ्यावा, असे वडिलांना सांगितले. त्यामुळे मुळातच दुसऱ्या इयत्तेतून शिक्षणास सुरवात केलेले रामदास कोकरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण गावात उपलब्ध नसल्याने राजुरी येथे ते अनवाणी पायांनी जात असत. दहावीचे शिक्षण करमाळा येथून तर बारावीचे शिक्षण बार्शीतून पूर्ण केले. कृषी पदवीसाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथे ऍडमिशन घेतले व चांगल्या रीतीने ते पूर्णदेखील केले. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून कृषी वनस्पतिशास्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 

रिटेवाडी गावाच्या विकासाचा ध्यास 
परिस्थिती अत्यंत बिकट. मेंढपाळांच्या हालअपेष्टा, कष्टप्रद जीवन, गावचे उजनी धरणामुळे पुनर्वसन झाल्यानंतर पदोपदी सोयी-सुविधांसाठी करावा लागणारा संघर्ष हे त्यांनी जवळून अनुभवलं होतं. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेत असताना व नंतर पूर्ण झाल्यावरही गावाकडे दुर्लक्ष केले नाही. गावात काही नावीन्यपूर्ण योजना राबवता येतात का, यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. 2007 मध्ये रिटेवाडीला निर्मलग्राम पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गावाला रस्ता नाही याची खंत त्यांना कायमस्वरूपी होती. त्यामुळे रस्ता करण्यासाठी ते अथक परिश्रम घेत होते. रिटेवाडीचे पुनर्वसन झाल्यानंतर 40 वर्षांनी सध्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. गावासाठी त्यांची कष्ट करण्याची जिद्द बघता गावकऱ्यांनी त्यांना गावचे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून द्यायचे ठरवले होते. परंतु वडिलांनी सांगितले, "सरपंच झालास तर फक्त एका गावचा विकास करशील अन्‌ एखादा प्रशासकीय अधिकारी झालास तर कित्येक गावांचा विकास करण्याची संधी मिळेल.' वडिलांच्या रामदास यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बघता त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास सुरू केला. 

पर्यावरण संरक्षणाविषयी संवेदनशील 
कृषी महाविद्यालय, पुणे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यास पोषक वातावरण मिळाले. 2005 मध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. गावचे सरपंच होऊन जे त्यांना करायचे होते ते त्यांनी प्रशासनात राहून करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली. पोलिस उपनिरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी गावोगावी बैठका घेऊन गावातील भांडणे, अनेक वाद सामंजस्य निर्माण करून मिटवले. 2008 मध्ये त्यांनी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये तंटामुक्त गाव ही मोहीम यशस्वीपणे राबवली. त्यांच्या कार्याचा अनेक पुरस्कारांनी गुणगौरव करण्यात आला. पोलिस सेवेत असताना देखील ते पर्यावरण संरक्षणाविषयी अत्यंत संवेदनशील होते. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शून्य कचरा व्यवस्थापन 
पुढे त्यांनी 2010 मध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदाचा राजीनामा दिला. त्यांची मुख्याधिकारीपदी निवड झाली होती. पर्यावरणप्रेमी असलेले रामदास कोकरे यांनी दापोली येथील मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कचरा विल्हेवाट करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या दिवशी त्यांनी प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नवनवे प्रयोग राबवले. त्याला नागरिकांनी देखील सहकार्य केले. असे त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण वेगळे उपक्रम राबवले. याची दखल तत्कालीन पर्यावरण सचिवांनी घेतली व त्यांचे अभिनंदन करत, या उपक्रमाचे अनुकरण सर्व नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये करण्यात यावे, असा आदेश काढला. दापोली नगरपरिषद अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा एक वेगळाच पॅटर्न तयार झाला. पुढे त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम मराठवाड्यातील औसा, केज येथेही राबविले. वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये केलेल्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. जगाला भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनोख्या कचरा वर्गीकरण पद्धतीचा स्वीकार करून कचरामुक्त शहराबरोबर कचरामुक्त डंपिंग ग्राउंड ही संकल्पना पुढे आणली व त्यानंतर कर्जत, माथेरान येथेही ही संकल्पना यशस्वी करून सध्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत शून्य कचरा संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 

ज्या ठिकाणी नियुक्ती होईल त्या ठिकाणी त्यांनी प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त नगरपरिषद अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळे त्यांना सर्वोत्कृष्ट मुख्याधिकारी, वसुंधरा मित्र, वसुंधरा सन्मान, सिंधुदुर्ग भूषण, समाजभूषण अशा विविध 20 हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

एका गावासाठी धडपडणारे रामदास कोकरे यांनी विविध शहरांत नवनवीन उपक्रम राबवत स्वतःचा एक वेगळाच पॅटर्न उभा केला आहे. हे सर्व करत असताना देखील त्यांचे गावाकडे लक्ष असून गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी, वृक्ष संवर्धनासाठी ते भर देतात. जर त्या वेळी सरपंच झालो असतो, तर आज एवढ्या शहरांमध्ये प्रशासनात राहून असे सामाजिक कार्य करता आले नसते, असे त्यांना वाटते. सध्या ते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com