घरच्या बिकट परिस्थितीमुळे बॅंकेची नोकरी वाचवण्यासाठी राज्यसेवेची नोकरी हातून गेली, तरीही जिद्द न हरता झाले डीवायएसपी ! 

Ratnakar Navale
Ratnakar Navale

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही. छोट्या-छोट्या अडचणी असो नाहीतर मोठं संकट असो, त्यातून बाहेर येऊन राजहंसाच्या चालीप्रमाणे पुन्हा डौलात ते आपलं आयुष्य जगायला सुरवात करतात. असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे रत्नाकर नवले होय. घरची परिस्थिती अत्यंत बेताची, त्यामुळे कॉलेज जीवनात वेळ प्रसंगी मित्र आर्थिक मदत करत असत, परंतु कधीही परिस्थितीचा बाऊ न करता, येईल त्या परिस्थितीला सामोरे जात, बॅंकेतील मार्केटिंग अधिकारी, गटविकास अधिकारी अशा दरवर्षी नवनवीन नोकऱ्या करत ध्येयाकडे वाटचाल करत त्यांनी पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. 

रत्नाकर नवले यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई शेतमजूर तर वडील गिरणी कामगार होते. चार बाय चार पत्र्याच्या खोलीत रत्नाकर हे आई, वडील व भावासोबत राहात होते. स्वतःच्या मालकीची शेती नसल्याने रोजंदारीने कामाला जात असत. तर घरच्या बिकट परिस्थितीमुळे मोठे भाऊ किशोर नवले हे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. रत्नाकर हे लहानपणापासूनच हुशार असल्याने आईवडिलांची त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. रत्नाकर नवले यांच्या शिक्षणासाठी त्यांचे आई-वडील अपार कष्ट करत असत. त्यामुळे ते रत्नाकर यांना शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही उणीव भासू देत नसत. अभ्यासाची आवड असलेल्या रत्नाकर दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांच्या शालेय जीवनात त्यांना नवोदय विद्यालय, दारफळ व नवोदय वाचनालयाचा खूप फायदा झाला. त्यामुळेच ते इथंपर्यंत पोचले, असे सांगतात. 

पुढे त्यांचे अकरावी व बारावीचे शिक्षण सोलापूर येथील दयानंद कॉलेजमध्ये झाले. हे सर्व शिक्षण घेत असताना त्यांना परिस्थितीची जाणीव होती. परंतु त्यांनी या गोष्टीचा कधीही बाऊ केला नाही. आलेल्या संकटांना सामोरे जात, परिस्थितीशी दोन हात करत ते पुढे जात होते. परिस्थितीची जाणीव असल्याने रत्नाकर यांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन नोकरी करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांची धडपड ही तशीच होती. सोलापूर येथे शिक्षण घेत असताना त्यांना जिवाभावाचे मित्र भेटले. रत्नाकर यांची शिक्षणातील घोडदौड सुरूच होती. 

सोलापुरात शिक्षणाच्या निमित्ताने रस्त्यावरून जात असताना शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालये पाहून त्यांना मनात कुठेतरी आपणही असेच उच्च अधिकारी व्हावे, असे वाटत होते. पुढे बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, डीएड की कृषी? या संभ्रमात असताना त्यांनी कृषी पदवीसाठी कोल्हापूर येथे प्रवेश घेतला. त्या निर्णयाचा त्यांना आज आनंद होतो, असेही ते सांगतात. एकाग्र मन व ठाम निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वासाच्या बळावर, जिद्द व चिकाटीने त्यांनी आपले शिक्षण व्यवस्थित पार पाडले. अनेकवेळा कॉलेजमध्ये त्यांना पैशाची चणचण भासत असे. आई-वडिलांकडून सतत पैसे मागणे हे त्यांना पटत नव्हते. आईवडील कसे कबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकत आहेत याची पूर्णपणे जाणीव रत्नाकर यांना होती. त्यांच्या या घरच्या परिस्थितीची सर्व जाणीव मित्र कंपनींना असल्याने, या मित्रांनी कॉलेज जीवनात कधीही पैशाची गरज लागल्यास सहजासहजी त्यांना परिस्थितीची जाणीव भासू देत नव्हते. 

त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना एलआयसी विमा कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असताना देखील त्यांना अपेक्षित अशी नोकरी नसल्याने, ही नोकरी स्वीकारली नाही. पुढे त्यांना स्टेट बॅंकेतही नोकरीची संधी उपलब्ध झाली. आधीच एक नोकरीची संधी सोडली होती. परंतु आता नोकरी करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी स्टेट बॅंकेची नोकरी स्वीकारली. कृषी पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. त्यामुळे एमपीएससीची पूर्वपरीक्षा ते या नोकरी आधीच पास झाले होते. या कालावधीतच त्यांना औरंगाबाद येथे बॅंकेची मुलाखत असल्याने तिथे जाणे गरजेचे होते. परंतु परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, अक्षरशः तिथे जाण्यासाठी त्यांच्याकडे तेवढेही पैसे नव्हते. त्यावेळी देखील मित्रांनी त्यांची ही गरज पूर्ण केली. 

औरंगाबाद येथे ट्रेनिंग सुरू होत असताना, एमपीएससीचे मुख्य परीक्षेचे ठिकाण पुणे येथे आले होते. त्यांनी औरंगाबाद सेंटरमधून वेळ काढून पुणे गाठले. अशा धावपळीत कसेबसे त्यांनी दोन पेपर दिले. आणखी चार पेपर असताना औरंगाबाद सेंटरमधून त्यांना ट्रेनिंगसाठी हजर राहण्याची सूचना मिळाल्याने नाइलाजास्तव त्यांनी मुख्य परीक्षेचे इतर पेपर न देता थेट औरंगाबादचा रस्ता धरला. कारण, राज्यसेवेच्या परीक्षेनंतर निकालापर्यंत भविष्य नक्की नव्हते. परंतु हातात असलेली नोकरी जाण्याची दाट शक्‍यता असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. अशा या धावपळीमुळे राज्यसेवा तर हातून गेलीच त्याचबरोबर पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली होती तीही हातून सुटली. 

रत्नाकर हे नोकरीच्या निमित्ताने बॅंकेत रुजू झाले. एका वर्षात त्यांच्यासोबत या सर्व गोष्टी घडल्या होत्या. परंतु ते हार मानणारे नव्हते व एका अपयशाने खचून जाणारे देखील नव्हते. त्यामुळे ते नोकरी करत पुन्हा स्पर्धा परीक्षेकडे वळले. राज्यसेवेच्या दुसऱ्या प्रयत्नात ते पूर्वपरीक्षा पास झाले व बॅंकेत इकडे एक वर्षही पूर्ण झाले होते. याच कालावधीत त्यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या परीक्षेत यश मिळवले. त्यामुळे त्यांनी बॅंकेच्या नोकरीला राजीनामा देत राज्य गुप्तचर विभागाच्या नोकरीला प्राधान्य दिले. राज्य गुप्तचरचे प्रशिक्षण पुणे येथे सुरू असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेचे ठिकाण औरंगाबाद येथे आले. परंतु गेल्या वेळेस झालेली चूक त्यांना या वेळी करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षण कालावधीतून सुटी घेत औरंगाबाद येथे राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली. राज्य गुप्तचर विभागात साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असताना राज्यसेवेतून त्यांची गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य गुप्तचर विभागाच्या नोकरीला राजीनामा देत गटविकास अधिकारी म्हणून ते सोलापूर येथे रुजू झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे यश स्वतःच्या जिद्दीने व प्रयत्नांनी साकारले होते. 

"प्रामाणिकपणे कष्ट केल्यास या जगात अशक्‍य असे काहीच नाही' हे त्यांना चांगलेच समजले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण की, मनात कुठेतरी त्यांना खाकी वर्दीबद्दल खास आकर्षण होते. अखेर त्यांची 2013 साली राज्य सेवेतून पोलिस उपअधीक्षक या पदी निवड झाली. सोलापूर येथे शिक्षण घेत असताना पाहिलेले स्वप्न व आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज आज अखेरीस पूर्ण झाले होते. लहानपणी चार बाय चार पत्र्याच्या खोलीत अभ्यास करणाऱ्या रत्नाकर यांनी कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले होते. एकापाठोपाठ एक नोकऱ्या हातात येत असताना विशेष म्हणजे त्या नोकऱ्या सांभाळून देखील त्यांनी हे यश संपादन केले आहे. एकेकाळी मुलाखतीला जाण्यासाठी पैसे नसणाऱ्या रत्नाकर यांनी तीन ते चार वर्षात जवळपास राज्यसेवेतून तीन वेळा यशस्वी होत, इतर दोन नोकऱ्या मिळवल्या होत्या. एका सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश व संघर्षमय प्रवास असणाऱ्या रत्नाकर नवले यांचा आदर्श इतर युवकांनी घेतला पाहिजे. सध्या ते सांगली जिल्ह्यातील जत येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

प्रतिकूल आर्थिक स्थिती तुमच्या ध्येयपूर्तीसाठी अडथळा ठरू शकत नाही; फक्त बुद्धिमत्तेस आत्मविश्वास आणि संघर्षाची जोड हवी. 
- रत्नाकर नवले, 
पोलिस उपअधीक्षक, जत (जिल्हा सांगली) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com