Success Story : भावाने धीर दिला, "आम्ही शिकलो नाही, पण तू पुढे शिकावेस'!' आज सदानंद यांनी घातली आयआरएसला गवसणी 

अक्षय गुंड 
Tuesday, 10 November 2020

डोळ्यासमोर घरची आर्थिक परिस्थिती होती. परंतु या काळात भावाने मोठे पाठबळ दाखवले. "आम्ही शिकलो नाही, परंतु तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तूच घरची परिस्थिती बदलू शकतोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत', असा भावनिक व खंबीर आधार भावाने दिला. त्यामुळे नोकरी न स्वीकारता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला अन्‌ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयआरएस या पदाला गवसणी घातली. सदानंद कसल्लू असे त्या युवकाचे नाव. नांदेड जिल्ह्यातील डोणगाव हे त्यांचे गाव. 

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : घरची परिस्थिती अत्यंत बिकट... अशा परिस्थितीतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले... शेवटच्या वर्षात नोकरीची संधी उपलब्ध झाली असताना मनात मात्र प्रशासकीय उच्च अधिकारी होण्याचे स्वप्न होते... त्यामुळे नोकरी की स्पर्धा परीक्षा, असा कठीण प्रश्न उभा होता. कारण, डोळ्यासमोर घरची आर्थिक परिस्थिती होती. परंतु या काळात भावाने मोठे पाठबळ दाखवले. "आम्ही शिकलो नाही, परंतु तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. तूच घरची परिस्थिती बदलू शकतोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत', असा भावनिक व खंबीर आधार भावाने दिला. त्यामुळे नोकरी न स्वीकारता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला अन्‌ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयआरएस या पदाला गवसणी घातली. सदानंद कसल्लू असे त्या युवकाचे नाव. नांदेड जिल्ह्यातील डोणगाव हे त्यांचे गाव. 

नांदेड जिल्ह्यातील डोणगाव हे जवळपास दोन हजार लोकसंख्या वस्तीचे खेडेगाव. आई-वडील शेतकरी, मोठा भाऊ ऑटोरिक्षा चालक. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. अशा परिस्थितीतून सदानंद यांचे शिक्षण सुरू होते. लहानपणापासूनच सदानंद हे शाळेत हुशार तर होतेच परंतु सामाजिक कार्यातही अग्रेसर असत. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. आणि दहावी व बारावी अहमदपूरला झाली. बारावीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचे मन स्पर्धा परीक्षेकडे वळले. कारण, या काळात त्यांना स्पर्धात्मक, ध्येयात्मक विद्यार्थीमित्र भेटले. चांगल्या रीतीने अभ्यास पूर्ण करून चांगले गुण मिळवून त्यांनी 2009 एसजीजीएसला प्रवेश मिळविला. परंतु कॉलेजचे शुल्क व इतर खर्च याचा खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. घरची परिस्थिती तर हलाखीची होती. परंतु आईवडील व दोन्ही मोठ्या भावांनी काबाडकष्ट करून आधार देत होते. घरच्या परिस्थितीचे भान राखून सदानंद यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण उत्तमरीत्या सुरू होते. 

सदानंद यांना अभ्यासाबरोबर इतर उपक्रमांतही जास्त आवड होती. त्यामुळे कॉलेजच्या सामाजिक कार्यातही ते पुढाकार घेत असत. हे सर्व करत असताना त्यांनी अभ्यासाकडे किंचितही दुर्लक्ष केले नाही. त्यामुळे अंतिम वर्षात असताना त्यांची कॉग्निझंटमध्ये निवड झाली. आयुष्याच्या टप्प्यावर हे त्यांच्या दृष्टीने पहिले मोठे यश होते. परंतु मनात कुठेतरी आपण अधिकारीच व्हायचं, असं त्यांनी ठरवलं होतं, म्हणून "नोकरी की स्पर्धा परीक्षा?' असा कठीण निर्णय त्यांच्या डोळ्यासमोर होता. कारण, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्या वेळेस मोठ्या भावाने सांगितले, "आम्ही शिकलो नाही, पण तू पुढे शिकले पाहिजेस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत', असं पाठबळ दिलं. शब्दांनी व भावनांनी पोट भरत नाही म्हणतात ना तशी परिस्थिती सदानंद यांची झाली होती. आई-वडील शेतात कष्ट करून भाऊ रिक्षा चालवून जे पैसे जमा होत असत त्यातून कुटुंबाचा गाडा हाकत सदानंद यांच्या शिक्षणासाठी पैसे देत असत. 

परंतु स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा दिल्लीचा एक वर्षाचा खर्च सदानंद यांनी सांगितला तेव्हा घरातले वातावरण चिंताग्रस्त झाले. परिस्थिती कशीही असो परंतु कुटुंब एकत्र त्या परिस्थितीचा सामना करत असेल तर अशक्‍य असं काहीच नाही, हे सदानंद यांच्या कुटुंबाने दाखवून दिले. भावाची शिकण्याची जिद्द पाहून मोठ्या भावाने यूपीएससीच्या क्‍लासचे शुल्क व राहण्याचा एक वर्षाचा खर्च उचलला. भावाची व कुटुंबाच्या आपल्याकडून असलेली अपेक्षा व जबाबदारी पाहता सदानंद यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यासाला सुरवात केली. परंतु 2014 साली पहिल्या प्रयत्नात अपयश आले. पण सदानंद हे हार मानणारे नव्हते. त्यांनी पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण होत होता. परंतु म्हणतात ना, एखादी गोष्ट मनापासून करण्याची ठरवली तर सर्व गोष्टी लागोपाठ उपलब्ध होत जातात, तसेच सदानंद यांच्या आयुष्यात घडले. यूपीएससीची तयारी करताना मध्य प्रदेशातील अक्षय दुबे हा जिवाभावाचा मित्र भेटला. त्याचे वडील आयआरएस अधिकारी होते. त्यांचे गाजियाबाद येथे इन्कम टॅक्‍स कॉलनीत घर होते आणि ते बंद होते. सदानंद व अक्षय तिथे राहून तयारी करत होते. त्यामुळे आर्थिक प्रश्न थोडासा हलका झाला होता. 

सदानंद यांनी दुसऱ्या प्रयत्नात पूर्व-मुख्य परीक्षा यशस्वी होऊन मुलाखत दिली पण भाग्याचा दरवाजा उघडला नव्हता. अपयश त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. परंतु जिद्द व चिकाटी असलेले सदानंद हे देखील यश मिळाल्याशिवाय थांबणारे नव्हते. त्यांनी पुन्हा त्याच जोमाने अभ्यास सुरू केला. दुसरीकडे कुटुंबीयांवरील आर्थिक ओझे कमी झाले होते. कारण, मित्राकडे राहण्याची सोय होती. खरोखरच मैत्री ही एक भावना आहे, जी अगदी अनोळखी लोकांना जवळ आणते आणि जो संकटसमयी साथ देतो तो खरा मित्र. अक्षय यांच्यासोबत अभ्युदय साळुंखे, सुयोग आंभोरे यांची भक्कम मानसिक सोबत मिळाली आणि यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नानंतर सदानंद यांचा आत्मविश्वास वाढला. 

"ग्रामीण भागातले आहोत, हिंदी, इंग्रजी बोलता येत नाही' हा न्यूनगंड निघून गेला. आता ध्येयप्राप्तीशिवाय माघार नाही, असा ठाम निर्धार करून परत ते यूपीएससीच्या तयारीला लागले. प्रयत्न करणाऱ्यापुढे अशक्‍य असे काहीच नाही, याचा प्रत्यय सदानंद यांना आला. अखेर यूपीएससी 2016 चा निकाल लागला. सदानंद यांच्या गावी आनंदाची वार्ता पसरली, की ते यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेत. घरात, गावात मोठा जल्लोष झाला. शेतकरी आई-वडील, कष्टकरी भाऊ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सामान्य कुटुंबातील मुलाने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले होते. आई-वडील व भावाच्या कष्टाचे आज अखेर चीज झाले होते. त्यांनी नागपूर येथे आयआरएसचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पहिली पोस्टिंग सांगलीला मिळाली. सध्या ते पुण्यात कार्यरत आहेत. 

सदानंद हे सोलापूरचे जावई असून त्यांच्या पत्नी राजश्री गुंड या मोहोळ तालुक्‍यातील आहेत. त्यादेखील राज्य लोकसेवा आयोगातून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून यशस्वी झाल्या आहेत. सध्या त्याही पुण्यात कार्यरत आहेत. सदानंद यांच्या यशात त्यांच्या पत्नी राजश्री यांची तितकीच मोलाची साथ मिळाली. 

सदानंद यांचा तरुणाईला संदेश 
कुठलीही गोष्ट अवघड नाही. मेहनत घ्या. पाठपुरावा करा. स्वतःशी प्रामाणिक राहा. प्रत्येक मोठे ध्येय हे कठीणच असते आणि प्रवास खडतर असतो. घाबरून ध्येयाला सोडू नका. आवडीने ध्येयाचा पाठलाग करा. नक्कीच ध्येयप्राप्ती होईल. वेळ मागेपुढे असेल, एक ना एक दिवस यशाची पहाट उजाडेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story: Sadanand Kasallu succeeds in IRS today thanks to his brother's patience and encouragement to study