"आई काळजी नको करू गं, मी एकतर न्यायाधीश नाहीतर शास्त्रज्ञ होईन !' आज तेजस्वी सातपुते आहेत सोलापूरच्या पोलिस अधीक्षक

Tejaswi Satpute
Tejaswi Satpute

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : 

'विद्येविना मती गेली 
मतीविना नीती गेली 
नीतीविना गती गेली 
गतीविना वित्त गेले 
वित्ताविना शूद्र खचले 
इतके अनर्थ एका अविद्येने घडले' 

महात्मा फुलेंच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या या पंक्तीचा प्रत्यय आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या गावातील सातपुते कुटुंबात पाहायला मिळतो. स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजलेल्या बाळासाहेब सातपुते यांनी लग्नानंतर स्वतःचे शिक्षण अपूर्ण असतानादेखील पत्नीला उच्चशिक्षण देऊन शिक्षिका बनविले. घरात शिक्षणाचे वारे शिरल्याने, त्यांच्या मुलीने तर जणू भाग्याचे दारच उघडले. जेएनसीएएसआर या संस्थेने 2006 मध्ये शास्त्रज्ञ घडवण्यासाठी देशातून 10 विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्यात महाराष्ट्रातून निवड झालेल्या तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही एकमेव विद्यार्थिनी होती. त्यामुळे आपली मुलगी आता लवकरच शास्त्रज्ञ होणार, अशी अपेक्षा आई-वडिलांना होती. परंतु तेजस्वी यांनी शास्त्रज्ञ तर सोडाच पण सातत्याने शैक्षणिक क्षेत्र बदलत कधी वैमानिक, कधी न्यायाधीश असे सांगू लागल्याने आई-वडिलांची चिंता वाढत चालली होती. परंतु तेजस्वी यांचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास, ठाम निर्णय घेण्याची क्षमता असल्याने त्यांनी या काळात "आई काळजी नको करू गं, मी एक तर खूप प्रसिद्ध न्यायाधीश नाहीतर शास्त्रज्ञ होईन गं!' असे सांगितले होते. असेच त्या "हे होणार, ते होणार' असे सांगत अखेर 2012 मध्ये यूपीएससीतून आयपीएस पदाला गवसणी घातली. 

तेजस्वी बाळासाहेब सातपुते (आयपीएस) यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव. घरची परिस्थिती तशी सामान्यच. एकूण सत्तावीस सदस्यांचे मोठे कुटुंब. एवढ्या मोठ्या कुटुंबात दहावी पास झालेली पहिली मुलगी म्हणून यांची घरात वेगळीच ओळख. कुटुंबात सर्वाधिक शिकलेली व्यक्ती म्हणजे यांच्या आई कृष्णाबाई. स्पर्धा परीक्षेतील अथवा शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना तेजस्वी यांच्यावर आई-वडिलांचा मोठा ठसा होता. कारण, काही कौटुंबिक अडचणीमुळे वडिलांना दहावीनंतर आयटीआय करून शिक्षण सोडावे लागले. स्वतःच्या ट्रॅक्‍टरवर ड्रायव्हर म्हणून, एलआयसीचे एजंट म्हणून, वीटभट्टी असे कितीतरी व्यवसाय त्यांनी केलेत. या काळात त्यांचा विवाह कृष्णाबाई यांच्याशी झाला. त्यांचेही शिक्षण अर्धवटच राहिले होते. परंतु त्यांची शिकण्याची जिद्द असल्याने बाळासाहेब सातपुते यांनी त्यांना पुढील शिक्षणास उत्तेजन दिले. वडिलांच्या सशक्त पाठिंब्यामुळे त्यांच्या आई डीएड करून प्राथमिक शिक्षिका झाल्या. नोकरी करत-करत बीए अन्‌ एमएसुद्धा झाल्या. आता तर त्यांची पीएचडी करण्याची आकांक्षा आहे, असे आयपीएस तेजस्वी सातपुते "सकाळ'शी बोलताना सांगतात. 

आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे आपल्या मुलांनीही खूप शिकावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यासाठी त्या सुरवातीपासून आग्रही होत्या. त्यामुळे शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातूनच उत्तमरीत्या मिळत होते. आईचे मुलींच्या अभ्यासावर वैयक्तिक लक्ष असल्याने, तेजस्वी सातपुते या चौथीच्या परीक्षेत केंद्रात पहिल्या आल्या. त्यानंतर त्यांना वर्गात प्रथम येण्याचे जणू व्यसनच लागले होते. तेजस्वी यांच्या अभ्यासातील सातत्यामुळे त्यांनी दहावीत गुणवत्ता यादीत यावं, अशी अपेक्षा त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केली. शिक्षकांनी व्यक्त केलेली अपेक्षा त्यांनी पूर्ण करत एक यशस्वी शिखर पार केले होते. त्यांच्या शाळेत याअगोदर काही वर्षांपूर्वी कुणीतरी गुणवत्ता यादीत आलं होतं. त्यानंतर तेजस्वी यांच्या यशामुळे पुन्हा एकदा शाळेने गुणवत्ता यादीत नाव पटकावले होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला होता. इतर मुलींप्रमाणे त्यांनाही डॉक्‍टर किंवा इंजिनिअर हो, असा सल्ला देण्यात आला. परंतु त्यांनी नकार दिला. कारण, लहानपणापासून वैमानिक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले फक्त. त्याला कारणही तसंच आहे. त्यांना कुणीतरी सांगितले होते चष्मा असेल तर वैमानिक होता येत नाही. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. बारावीत त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे त्यांचा नंबर इंजिनिअर, एमबीबीएस अगदी सहजरीत्या लागला असता; परंतु त्यांना डॉक्‍टर, इंजिनिअर व्हायचे नाही अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. 

त्यामुळे त्यांनी शास्त्रज्ञ होण्यासाठी महाराष्ट्रात नवीनच सुरू झालेल्या बीएस्सी (जैवतंत्रज्ञान) या अभ्यासक्रमाला जायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. या पदवीत त्यांना उत्तम गुण मिळाले. याच कोर्सदरम्यान, बंगळूर येथे जेएनसीएएसआर या संस्थेने संशोधनाच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ घडवण्यासाठी देशातून दहा विद्यार्थ्यांची निवड केली होती, त्यात महाराष्ट्रातून तेजस्वी सातपुते या एकमेव विद्यार्थिनी. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचा पीएचडीपर्यंतचा प्रवेश तोही भारतातील मान्यवर संस्थेत निश्‍चित झाला होता. मात्र, तो अभ्यासक्रम दोन वर्षे केल्यानंतर शास्त्रज्ञ होणं हे आपलं काम नाही, त्यामुळे शास्त्रज्ञ होण्याचा विचार तेथेच सोडून दिला. 

बीएस्सी झाल्यावर पुढे नियमित एमएस्सी करण्यात तर त्यांना अजिबातच रस नव्हता. अगदी काही अंशी एमबीए करावेसे वाटत होतं; मात्र बीएस्सी नंतरच्या करिअरच्या सर्व संधी मावळल्या होत्या. शेवटी एक आयएलएस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश चालू असल्याचं त्यांन समजलं. त्या वेळी तेजस्वी यांचा बंगळूरवरून परतीचा प्रवास चालू होता. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या प्रवेशाचा अर्ज लॉ कॉलेजमध्ये भरला. तिकडे कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा मोठा कल असल्याने, मोठी स्पर्धा होती. त्यामुळे पहिल्या दोन याद्यांमध्ये नंबर लागला नाही. अखेर तिसऱ्या यादीत मात्र नंबर लागला. तिसऱ्या यादीत नंबर लागून देखील प्रथम वर्षाच्या परीक्षेत मात्र पहिल्या दहामध्ये त्यांचा क्रमांक आला होता. त्यामुळे लॉ करत असताना त्याची गोडी निर्माण झाली. घरच्यांना त्यांनी "मी आता न्यायाधीश होणार असल्याचं स्वप्न दाखवलं.' मुलीने डॉक्‍टर व्हायचे नाकारले तेव्हा आईनं समजून घेतलं, पुन्हा शास्त्रज्ञ व्हायचं मधूनच सोडलं अन्‌ एमएस्सी सोडून लॉ शिक्षण घ्यायचे ! त्यामुळे आई थोड्या चिंताग्रस्त वाटत असल्याने तेजस्वी यांनी "आई काळजी नको करू गं ! मी एक तर खूप प्रसिद्ध शास्त्रज्ञ होईन नाहीतर न्यायाधीश!' असे सांगितले. 

पुढे मग कायद्याच्या अभ्यासाचं दुसरं वर्ष सुरू झालं. त्यांना स्वतःला देखील त्या अभ्यासात रस निर्माण झाला होता. या वर्षात यूपीएससीचा अभ्यास करत असलेल्या मित्र-मैत्रिणींशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यामुळे त्यांच्या मनात "आपल्यासाठी यूपीएससी हे क्षेत्र अगदी योग्य आहे' असे वाटू लागले अन्‌ मग ठरले. एलएलबीची चौथी सेमिस्टर चालू असताना तेजस्वी यांनी आयएएस होण्याचे स्वप्न मनी बाळगले व त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्यामुळे न्यायाधीश होण्याच्या प्रक्रियेवर पूर्णविराम बसला. चौथी सेमिस्टर होण्याच्या अगोदरच कायद्याची ही विद्यार्थिनी थेट कॉलेजच्या बाहेर. आता काय? तर कलेक्‍टर व्हायचंय..! 

कलेक्‍टर होण्याच्या या प्रक्रियेत एलएलबीची चौथी सेमिस्टर आणि यूपीएससीचा पहिला प्रयत्न या दोघांचाही बळी गेला. यूपीएससी करण्याच्या नादात चौथी सेमिस्टरची परीक्षा त्यांनी दिलीच नाही. परंतु त्यांनी आता कलेक्‍टर होण्याचा ठाम निर्णय घेतला होता. तेजस्वी यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सतत बदलत असलेल्या निर्णयामुळे बरेचजण त्यांच्या आई-वडिलांना विचारायचे... "तेजस्वीचे न्यायाधीश, शास्त्रज्ञ, वैमानिक काय झाले...' प्रत्येक वेळी समोर आलेला प्रश्न सारखा असला तरी शैक्षणिक प्रवासाच्या वेगवेगळ्या वळणांवर दिलेली उत्तरे मात्र वेगवेगळी होती. सतत बदलत असलेले क्षेत्र यामुळे लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष करत. 

त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मुंबई गाठले. येथे त्यांची मैत्री क्षिप्रा आग्रे यांच्यासोबत झाली. या दोघींनी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह तसेच वेळ मिळेल तिथे असेल त्या परिस्थितीत यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. स्पर्धा परीक्षा काळात गावाकडे जायचे झाल्यास त्या रात्री उशिरा गावाकडे जाऊन सकाळी भल्या पहाटे मुंबईच्या दिशेने रवाना होत असत. या काळात त्यांना कुटुंबाची मोलाची साथ लाभली. कारण, किती शिकणार? कधी नोकरी लागणार? आणखी किती दिवस अभ्यास करणार? असे प्रश्न घरच्यांनी मात्र कधीही विचारले नाहीत. उलट "तू अभ्यास कर, बाकीचे नंतर पाहू' असा धीर दिला. त्यामुळे त्या बिनधास्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागल्या. 

अन्‌ अखेर तो भाग्याचा दिवस उजाडला 2012 साली झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांची आयपीएसपदी निवड झाली. स्वतःवर असलेला आत्मविश्वास, ठाम निर्णय घेण्याची क्षमता, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका, आई-वडिलांची मोलाची साथ या सर्व गोष्टींमुळे तेजस्वी सातपुते यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशानंतर नागरिकांची अभिनंदन करण्यासाठी घरी होत असलेली गर्दी पाहून त्यांच्या आजीच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आपल्या नातीने काहीतरी मोठं केलं, ही बाब आजीलाही समजली. पण आयपीएस वगैरेशी आजीचा काही संबंध नसल्याने, कुतूहलाने आजीने "नेमकी तू कसली अधिकारी झालीस' असे विचारले. तेजस्वी यांचे उत्तर "मी आयपीएस अधिकारी झाले.' "म्हणजे ते काय असतं' असं आजीने परत विचारलं. त्यावर तेजस्वी म्हणाल्या की, "जिल्ह्याच्या पोलिस प्रमुख असतात ना तशी अधिकारी झालेय.' आजी परत म्हणाल्या, "मग इथल्या सगळ्या पोरांना करशील का पोलिीस?' यावर परत तेजस्वी म्हणाल्या की, "आजी तसं करता येत नसतं गं!' 

असे सामान्य कुटुंब असलेल्या सातपुते कुटुंबाची मुलगी आज गावचे व कुटुंबाचे नाव देशभर गाजवत आहे. सध्या त्या सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सातारा पोलिस अधीक्षक म्हणून उत्तमरीत्या प्रशासकीय कार्य राबवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com