शाळेत एकही दिवस न गेलेला इंजिनिअर ! स्वत:च्या जिवावर निर्माण केली वेगळी ओळख

Mechanic
Mechanic

बेगमपूर (सोलापूर) : शाळेची पायरीही चढलेली नाही... केवळ अनुभव हीच शाळेची इयत्ता... यातूनच मिळालेल्या शिक्षणातून डिझेलवर चालणाऱ्या इंजिन व अन्य यंत्रांच्या दुरुस्तीची कामे सहजपणे करणारे एकोणऐंशी वर्षे वयाचे वडदेगाव (ता. मोहोळ) येथील दळवे भाऊ म्हणजेच दळवे मिस्त्री हे नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या आजच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जणू ऊर्जाच देत आहेत. 

जनार्दन नामदेव दळवे यांचा वडिलोपार्जित मुख्य व्यवसाय शेती. कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. लहानपणापासूनच शेती व शेतकामाची आवड. त्यामुळे शाळेला जाण्याचा किंवा शाळा शिकण्याचा विचारच त्यांनी केला नाही. 

उपलब्ध बागायती शेतीला विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करावा लागे. त्यासाठी विहिरीवर दोन इंजिनची व्यवस्था केलेली. ऊस गाळपासाठी शेतातच गुऱ्हाळ तर ज्वारीची रास करण्यासाठी स्वमालकीचे मळणी यंत्र. ही सर्व कामे घरच्या घरीच केली जात असे. सुमारे पस्तीस वर्षांपासून गुऱ्हाळ व मळणी यंत्रे घरीच असल्याने दळवे यांचा या यंत्रांशी लहानपणापासून चांगलाच संबंध आलेला. 

दरम्यान, एखाद्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास दळवे यांचे वडील इंजिन दुरुस्तीसाठी अन्य गावाहून एखादा मिस्त्री (मेकॅनिकल) बोलावत असे. या वेळी दळवे हे त्या मिस्त्रीजवळ बसत असत. तो इंजिनची दुरुस्ती कशाप्रकारे करतो, त्यात नेमका काय बिघाड आहे, त्याला काय म्हणतात, त्याच्या दुरुस्तीसाठी वापरलेल्या साहित्याची नावे काय आहेत, याकडे ते अत्यंत बारकाईने निरीक्षण करीत. परिणामी, यातूनच त्यांनी इंजिन दुरुस्तीचे ज्ञान केवळ बघून आलेल्या अनुभवातून अगदी सहजच अवगत केले. आपणही इंजिनची दुरुस्ती करू शकतो, याची त्यांना खात्री झाली आणि 1965 नंतर ते इंजिन दुरुस्तीची कामे अत्यंत सफाईदारपणे स्वतःच करू लागले. त्यांच्या कामाचा हातखंडा पाहून पाहुणे, मित्र परिवार व शेजारच्या शेतकऱ्यांची कामेही त्यांच्याकडे येऊ लागली. सुरवातीला सुमारे दहा वर्षे म्हणजे 1975 पर्यंत त्यांनी विना मोबदलाच ही कामे केली. कालांतराने कौटुंबिक खर्च, इतर काही अडचणींमुळे ते या कामांसाठी नाइलाजाने त्या काळी दोनशे रुपये मजुरी घेऊ लागले. 

आज महागाई वाढलेली आहे. मजुरीचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे सध्या दोन हजार ते अडीच हजारात इंजिन दुरुस्तीची कामे करतात. विशेष म्हणजे, चष्म्याशिवाय त्यांचे काम सुरू असते. याशिवाय दुरुस्तीबरोबरच वेगवेगळे पार्ट आणून नवीन इंजिनची जोडणी व जुन्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यास ते इंजिनची थेट खोल फिटिंग करून तितक्‍याच खुबीने पुन्हा जैसे थे बसवतात. 

शिक्षणाचा गंध नसलेले जनार्दन भाऊ इंजिन साहित्यांची (पार्टस) नावेही सहजपणे सांगतात, हे विशेष. सध्या शेतीसाठी डिझेल इंजिन ऐवजी विद्युत मोटारीचा वापर वाढलेला आहे. परंतु विजेची समस्या पाहता अनेक शेतकऱ्यांकडे आजही विहिरीसाठी आवश्‍यक क्रेन, जनरेटर, कॉम्प्रेसर, मळणी यंत्र व रसपान गृहासाठी इंजिनचाच वापर होत आहे. त्यामुळे इंजिन दुरुस्तीचा व्यवसाय हा बारमाही चालणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 

सध्या गावोगावी आधुनिक पद्धतीने इंजिन दुरुस्ती करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. परंतु दळवे मिस्त्री यांचा जुना ग्राहक वर्ग त्यांच्यापासून आजही दुरावलेला नाही. काही दिवसांपूर्वीच अंगात पांढऱ्या रंगाचे बनियान (बंडी), धोतर परिधान केलेले दळवे मिस्त्री गावाजवळीलच एका शेतकऱ्याकडे ते मळणी यंत्रांच्या इंजिन दुरुस्तीचे काम करताना दिसून आले. 

मागील अनेक वर्षांपासून दळवे भाऊच आमच्याकडील मळणी यंत्रांची दुरुस्तीची कामे करत असल्याचे नेताजी व रवी साळुंखे यांनी सांगितले. सद्य:स्थितीत कित्येक सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात फिरताना पाहावयास मिळतात. परंतु पुस्तक वाचून नव्हे तर अनुभवाच्या शाळेत "इंजिनिअरिंग' झालेले दळवे भाऊ म्हणजे दळवे मिस्त्रीची आजही काम करण्याची ऊर्मी नक्कीच अनेकांना ऊर्जा देणारी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com