बार्शी तालुक्‍यात खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग; लॉकडाउनमध्ये लाखोंचे उत्पादन 

शांतीलाल काशीद
Wednesday, 17 June 2020

बार्शीत तालुक्‍यात सीताफळ, द्राक्ष आणि आता खजूर 
बार्शी तालुक्‍यात गोरमाळे येथील सीताफळ, हिंगणी-पिंपरीची द्राक्ष व राजेंद्र देशमुख यांचे खजूर आता प्रसिद्ध झाले आहे. राजेंद्र देशमुख बार्शी तालुक्‍यात खजूर शेतीसाठी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील सौंदरे येथे राजेंद्र देशमुख यांनी कमीत कमी पैसे खर्च करून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे हे खजूर शेतीतून दाखवून दिले आहे. राजस्थान, गुजरातनंतर महाराष्ट्रात पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी तालुक्‍यात राजेंद्र देशमुख यांनी खजूर शेतीचा प्रयोग यशस्वी करून इतरांसाठी प्रेरणा निर्माण केली आहे. 
संचारबंदीमुळे द्राक्ष, टोमॅटो, कलिंगड, संत्रा, केळी यासारख्या फळबागाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र राजेंद्र देशमुख यांनी इतरांपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत खजूर शेतीचा पर्याय स्वीकारला आणि आज त्यांना त्यातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळत आहे. शिक्षण कमी असताना देखील बार्शी तालुक्‍यात त्यांची प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 1988 पासून शेती करीत असताना नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करीत काळानुरूप वेगवेगळ्या पिकांचे पर्याय त्यांनी निवडले आहेत. याअगोदर त्यांनी दुबई, युरोप येथे द्राक्ष एक्‍स्पोर्ट केली आहे. शेती करताना नेहमी व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून शेती करायची असे त्यांचे मत आहे. म्हणूनच 2000 ते 2020 पर्यंतचा शेतातील सर्व नफा-तोट्याचा ताळेबंद आजही त्यांच्याजवळ लिखित स्वरूपात आहे, हे विशेष आहे. राजेंद्र देशमुख यांनी गुजरात येथून खजुराचे वाण आणले असून तीन एकरात दोन हजार रोपांची लागवड केली आहे. खजूर शेतीत आंबा, सीताफळ, गोड चिंच, शेवगा यासारखे आंतरपीक घेऊन अधिकचे उत्पन्न मिळवले आहे. त्यातून मिळणारे टाकाऊ मटेरिअल गोळा करीत उत्तम कंपोस्ट खत करून सेंद्रिय शेतीचा संदेश दिला आहे. खजूर शेतीत रोप लागवडीपासून चार वर्षांत झाडाला फळ येणे सुरू होते. एका झाडाला कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 250 फळे लागतात. त्यास 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत दर मिळतो. खजुरातून साखर, प्रोटिन्स, फायबर्स, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेस मिळत असल्याने बाजारपेठेत मोठी मागणी आहे. खजूर आरोग्यासाठी उत्तम असल्याने श्री. देशमुख यांच्या खजुराला बार्शी बाजारपेठेबरोबरच देशातही मोठी मागणी मिळत आहे. सध्या विक्री सुरू असल्याने यावर्षी खजूर शेतीतून सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful experiment of dates farming in Barshi taluka production of lakhs in lockdown