
केत्तूर (सोलापूर) : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी झाला तरी ऊस उत्पादकांना उसाचा दर काय मिळणार? हे मात्र अद्याप माहीत नाही. सर्वच साखर कारखान्यांनी आजपर्यंत तरी ऊसदराचा निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. परिणामी ऊसतोड न झाल्याने उसाला तुरे आले आहेत.
असे असले तरीही, यावर्षी परतीचा पाऊस जास्त काळ रेंगाळल्यामुळे उसाच्या शेतात बरेच दिवस पाणी साचून राहिले. पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रातील ऊस पट्ट्यात आडसाली उसालाही सर्रासपणे सध्या तरी मोठ्या प्रमाणावर तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचे वजन घटणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे उत्पादक चिंतेत सापडला असून तो लवकरात लवकर आपला ऊस गाळपासाठी पाठविण्यासाठी धडपड करू लागला आहे. सर्वाधिक तुरे हे 265 जातीच्या उसाला मोठ्या प्रमाणावर आले आहेत. इतर जातीच्या उसाला तुरे आले आहेत परंतु त्याचे प्रमाण अल्प आहे.
गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाने शेवटी - शेवटी जोरदार हजेरी लावली व मुक्काम ठोकला. गळीत हंगामासाठी जाणारा ऊस अकरा - बारा महिन्यांचा झाला आहे, त्यामुळे उसाला तुरे फुटले आहेत.
करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील उच्च प्रतीचा ऊस बारामती ऍग्रो, अंबालिका शुगर, भैरवनाथ शुगर, कमलाई शुगर, मकाई सहकारी कारखान्याकडे जातो. परंतु सध्या ऊसतोडीचा वेग कमी झाला आहे. त्यातच यावर्षी ऊसतोड मजूरही कमी प्रमाणात आले आहेत. यापैकी कोणत्याही कारखान्याने उसाला दर किती देणार? हे मात्र अद्यापपर्यंत जाहीर केलेले नाही, हे विशेष.
आडसाली उसाला एवढ्या लवकर तुरा येण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटून उत्पादनावर परिणाम होणार आहे.
- उदय खाटमोडे-पाटील,
ऊस उत्पादक शेतकरी, केत्तूर
अतिवृष्टी व हवामानातील बदलामुळे सध्या उसाला तुरे आले आहेत. त्यामुळे वजनात घट होणार आहे व गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावणार आहे.
- चिंतामणी कानतोडे,
ऊस उत्पादक शेतकरी, केत्तूर
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.