यंदा उसाचे गाळप मे-जूनपर्यंत चालण्याची शक्‍यता 

प्रदीप बोरावके 
Sunday, 25 October 2020

दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरी यंदाच्या गाळप हंगामात सहा लाख टन उसाचे गाळप करणार आहे. तसेच यंदा उसाची उपलब्धता अधिक असल्याने उसाचे गाळप मे-जूनपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे, असे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी केले. 

माळीनगर (सोलापूर) : दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरी यंदाच्या गाळप हंगामात सहा लाख टन उसाचे गाळप करणार आहे. तसेच यंदा उसाची उपलब्धता अधिक असल्याने उसाचे गाळप मे-जूनपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे, असे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे यांनी केले. 

विजया दशमीच्या मुहूर्तावर कारखान्याच्या 87 व्या गाळप हंगामाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून आज झाला. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी कारखान्याचे सभासद समीर पांढरे यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. कारखान्याचे माजी अध्यक्ष निळकंठ रासकर, शुगरकेन सोसायटीचे अध्यक्ष घनश्‍याम भोंगळे, उपाध्यक्ष विशाल गिरमे यांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र गिरमे, पूर्णवेळ संचालक सतीश गिरमे, उपाध्यक्ष राहुल गिरमे, संचालक विलास इनामके, मोहन लांडे, विशाल जाधव, नीलकंठ भोंगळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

कारखान्याची शंभरीकडे यशस्वी वाटचाल चालू आहे, असा उल्लेख करून राजेंद्र गिरमे म्हणाले, कारखान्याने 2019-20 च्या हंगामातील पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. यंदाच्या हंगामात देखील कारखाना एफआरपीप्रमाणे दर देणार आहे. पाऊस जास्त झाल्याने शेतकरी व ऊस वाहतूकदार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. उसात पाणी असल्याने ऊसतोड करणे अवघड झाले आहे. अशातच सगळीकडेच रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाल्याने ऊस वाहतूक करण्यात अडचणी येत आहेत. यंदा उसाची उपलब्धता अधिक असल्याने उसाचे गाळप मे-जूनपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. दिवाळीसाठी कामगारांना 15 टक्के बोनस देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane threshing is likely to continue till MayJune this year