शेतकऱ्यांनो, भविष्य बदलायचे असेल तर स्वतःमध्ये बदल करून व्यावहारिक पत निर्माण करा : काकडे 

हुकूम मुलाणी 
Wednesday, 11 November 2020

शेतीतील भविष्य बदलायचे असेल तर स्वतःमध्ये बदल करून व्यावहारिक पत निर्माण करा. शेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे, असे सल्ला विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे सोलापूर विभागीय व्यवस्थापक सुहास काकडे यांनी दिला. 

मंगळवेढा (सोलापूर) : शेतीतील भविष्य बदलायचे असेल तर स्वतःमध्ये बदल करून व्यावहारिक पत निर्माण करा. शेतकरी आणि शेती व्यावसायिकांनी काळाची पावले ओळखून बदलत्या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेतला पाहिजे, असे सल्ला विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे सोलापूर विभागीय व्यवस्थापक सुहास काकडे यांनी दिला. 

डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास संस्थेच्या शेतकरी उपजीविका मॉडेलच्या भेटीप्रसंगी श्री. काकडे बोलत होते. या वेळी उपसरव्यवस्थापक बाबूराव सावंत, कर्ज विभागाचे सुनील खनिनदार, संस्थेचे कार्यकारी संचालक तुळशीदास करांडे, संचालक विवेक खिलारे, स्वप्नील कांबळे, प्रशांत कोरे, नागेश नरळे, समाधान करचे, यशवंत निळे आदी उपस्थित होते. 

श्री. काकडे पुढे म्हणाले, संस्थेने विकसित केलेले हेच मॉडेल शेतकऱ्यांचे जीवन बदलू शकते. सध्याच्या सामाजिक अधोगतीमध्ये बॅंकिंग आणि शेतकऱ्याचे कार्य महत्त्वाचे आहे. शाश्‍वत विकास व स्वतःच्या विकासासह बॅंकिंग पत सांभाळून शेतकरी त्याचे उत्पादन कमी खर्चात कसे वाढवू शकतो, याचे उत्तम मार्गदर्शन आणि उदाहरण म्हणजे लक्ष्मी कृषी विकास मॉडेल. हेच विकासाचे मॉडेल हे सर्व ठिकाणी वापरले गेले पाहिजे. मॉडेल सर्व ठिकाणी राबवले पाहिजे. त्यासाठी आवश्‍यक ती बॅंकिंग मदत मिळेल. 

या वेळी कार्यकारी संचालक तुळशीदास कारंडे म्हणाले, की कंपनीने ज्या पद्धतीने सर्व सभासदांचा वैयक्तिक विमा, पीक विमा, गट कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, मुरघास, मुक्त गोठा, देशी कोंबडी, शेळी पालन, गांडूळ खत, सेंद्रिय फळे, पालेभाज्या उत्पादन व खरेदी - विक्री, मत्स्य व्यवसाय आदींबाबत कार्य केले आहे. शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती मोफत उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना सहज कंपनीच्या गोष्टींचा लाभ घेण्याचे माध्यम उभे केले. त्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेतला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suhas Kakade said that farmers should change themselves and create practical credit