"पप्पा तुम्ही लवकर या, मला हे लोक त्रास देत आहेत'; मात्र पप्पा पोचायच्या आधीच नवविवाहितेने... 

Vidya Bedge
Vidya Bedge

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : "तिचा' सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते... नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसा महिनाभर संसार सुखी केला अन्‌ महिनाभरातच नवऱ्याने संसाराला उतरती कळा लावली. दररोज बायकोला घालून-पाडून बोलणे व हुंड्यासाठी जाच सुरू केला. त्या नवविवाहितेने चार-पाच महिने हे सर्व सहन केले, परंतु तिला आता गरोदर असताना देखील असा त्रास होऊ लागल्याने, या सर्व गोष्टीला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंढरपूर तालुक्‍यातील जळोली येथील ही घटना आहे. याबाबत नवविवाहितेच्या वडिलांनी करकंब पोलिस ठाण्यात नवरा, सासू, सासरा व दीर यांच्याविरोधात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे. 

माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक येथील विद्या औदुंबर बेडगे (वय 19) हिचा विवाह 4 फेब्रुवारी 2020 रोजी पंढरपूर तालुक्‍यातील जळोली येथील रणजित अंकुश गोड याच्याशी थाटामाटात झाला होता. विद्याला गोड कुटुंबीयांनी महिनाभर व्यवस्थित नांदवले. त्यानंतर तिला घालून-पाडून बोलू लागले तसेच माहेरच्या लोकांकडून मोटारसायकलसाठी पैसे आण म्हणून शिवीगाळ करू लागले. पैसे आणण्यासाठी नवरा विद्याचे नरडे दाबून जबरदस्तीने वडिलांना फोन करून पैसे आण म्हणत असल्याने विद्याने ही सर्व हकीकत वडिलांना सांगितली होती. वडील औदुंबर बेडगे यांनी विद्याच्या नवऱ्याची समजूत घालत सध्या परिस्थिती नाही असे सांगितले होते. परंतु तरीदेखील नवरा तिला दमदाटी, शिवीगाळ व हुंड्यासाठी त्रास देत होता. मे 2020 मध्ये ती गरोदर असल्याने तिला त्रास होत असताना दवाखान्यात न घेऊन जाता माहेरकडून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरवात केली. त्यामुळे विद्याने वडिलांना फोन करून "पप्पा, तुम्ही लवकर या, हे लोक मला दवाखान्यात नेत नसून उलट मी नाटके करत आहे असे म्हणत मला शारीरिक व मानसिक त्रास देत आहेत' असे सांगितले. वडील तिला दवाखान्यात नेण्यासाठी गेले असता, तिच्या सासरच्या लोकांनी "विद्या माहेरला येण्यासाठी पोटदुखीचे नाटक करत आहे, आम्ही तिचा दवाखाना करतो' असे सांगून वडिलांना माघारी पाठवले. परंतु तरीदेखील विद्या दररोज वडिलांना, "पप्पा तुम्ही या, मला हे लोक दवाखान्यात घेऊन जात नाहीत, उलट नाटक करते म्हणून शिवीगाळ करून त्रास देत आहेत' असे फोनवरून सांगत होती. 

2 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सासरे अंकुश संतराम गोड यांचा विद्याच्या वडिलांना फोन आला, की तुमची मुलगी घेऊन जा, ती वेड्यासारखी वागत आहे. त्याबरोबर लागलीच विद्याचे वडील व पुतण्या विकास बेडगे हे जळोली येथे विद्याच्या घरी गेली असता विद्या दिवाणवर झोपलेली दिसली. तर त्याच घरातील पंख्याला लाल रंगाची साडी लटकत असलेली दिसली. त्यामुळे सासरच्या लोकांना विचारले असता ते "तुमची मुलगी आहे तुम्हीच बघा', असे म्हणत घरातून निघून गेले. त्यामुळे विद्याच्या वडिलांनी विद्याला करकंब येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

गाडी घेण्यासाठी पैसे आण म्हणून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने तसेच सतत हुंडा मागत असल्याने, गरोदर असताना देखील तिच्यावर वेळेवर औषधोपचार न केल्याने तिने सासरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे नवरा रणजित अंकुश गोड, सासरा अंकुश संताराम गोड, सासू शांताबाई अंकुश गोड, दीर विश्वजित अंकुश गोड सर्व (रा. जळोली ता. पंढरपूर) यांच्याविरोधात करकंब पोलिस ठाण्यात विद्याचे वडील औदुंबर बेडगे यांनी फिर्याद दिली आहे. लग्नाला अजून सहा महिनेदेखील पूर्ण झाले नसून, अशी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com