
धुळीमुळे श्वसनाच्या विकारातून वाढेल कोरोनाचा प्रादुर्भाव
कोरोनाचा शहरातील संसर्ग आटोक्यात येत असून, मृत्यूदरही कमी झाला आहे. दुसऱ्या लाटेपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने बेडची संख्या अडीचशेपर्यंत वाढविली आहे. परंतु, शहरातील धुळीमुळे दमा, काळा अस्थमा (सीओपीडी) असलेल्यांना श्वसनाचा त्रास होऊन नियोनिया व कोरोनाचे नवे रुग्ण तयार होऊ शकतात.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत व महापालिकेच्या माध्यमातून शहरात ड्रेनेज व रस्त्यांची कामे सुरु आहेत. मात्र, महापालिकेकडून धुळीतून प्रदूषण होणार नाही, याबाबत कंत्राटदारांच्या निविदेत काहीच नियम व अटी टाकण्यात आलेल्या नाहीत. दमा, काळा आस्थमा असलेल्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होऊन निमोनिया आणि कोरोना होण्याची भीती वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस पत्र देऊन धुळीवर नियंत्रण आणा, असे पत्र दिले आहे.
महापालिका परिसरातील हवा दूषित
शहरात वालचंद कॉलेजजवळील चौक, रंगभवन व महापालिका परिसरात धुळीचे प्रमाण मोजण्याची यंत्रणा उभारली आहे. त्याठिकाणी 70 ते 75 मिलिग्राम परघनमीटर धुळीचे प्रमाण आढळत आहे. महापालिका व रंगभवन या परिसरात धुळीचे प्रमाण 75 मिलिग्रामपर्यंत आहे. मोजक्याच ठिकाणी यंत्रणा बसवून धूळ मोजली जात असल्याने इतर ठिकाणी (नवी पेठेसह अन्य बाजारांच्या ठिकाणी) हवा सर्वाधिक दूषित असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. शहरातील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, यादृष्टीने महापालिकेने कंत्राटदारांना निविदा देताना कामाच्या ठिकाणी पाणी मारण्याची व्यवस्था करावी, अशा अटी व नियम टाकणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पत्र महापालिकेस दिल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
शहरात हवेतील धुळीचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा कमी असायला हवे. ज्येष्ठ नागरिक, दमा, अस्थमा तथा काळा अस्थमा असलेल्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होणार नाही. मात्र, महापालिका, रंगभवन परिसरात धुळीचे प्रमाण 75 मिलिग्राम परघनमीटर असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शहरात रस्ते दुरुस्ती तथा नवा रस्ता तयार करताना, बांधकाम करतेवेळी टाकलेले मटेरिअल, ड्रेनेजचे काम सुरु असताना धुळीचे प्रमाण वाढते, असे निरीक्षण प्रदूषण मंडळाने नोंदविले आहे. कोरोना हा श्वसनाशी संबंधित आजार असल्याने त्याचा संसर्ग वाढण्यास धूळ कारणीभूत ठरु शकते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण आहे. शहरातील धुळीचे प्रमाण कमी करुन हवा स्वच्छ व निरोगी राहावी, या हेतूने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बाजार समिती परिसर व रूपाभवानी मंदिर परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आता नवी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
धुळीमुळे श्वसनाच्या विकारातून वाढेल कोरोनाचा प्रादुर्भाव
कोरोनाचा शहरातील संसर्ग आटोक्यात येत असून, मृत्यूदरही कमी झाला आहे. दुसऱ्या लाटेपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने बेडची संख्या अडीचशेपर्यंत वाढविली आहे. परंतु, शहरातील धुळीमुळे दमा, काळा अस्थमा (सीओपीडी) असलेल्यांना श्वसनाचा त्रास होऊन नियोनिया व कोरोनाचे नवे रुग्ण तयार होऊ शकतात.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर