कोरोना संकटात गरजूंना त्या सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा आधार

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 22 जून 2020

भाऊसाहेब आंधळकर यांनी लाॅकडाउनच्या काळात बार्शी शहर व परिसरात राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालयाच्या माध्यमातून दररोज अनाथ गरजूंना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली.  तसेच भूमिपुत्र अभियान, बेरोजगार तरुणांना ऑनलाइन नोकरी मेळावे घेतले. परप्रांतीयांना मायदेशी परतण्यासाठीची उपाययोजना केल्या.  गरीब गरजू कुटुंबांतील मुले दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले.

मळेगाव(सोलापूर): सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांनी सेवानिवृत्तीनंतर कोरोना संकटात अनेकांना मदत केली. परराज्यातील कामगारासह अनेक गरजूंना मोफत जेवणाचे डबे पुरविण्यासोबत अनेक अभियान व मदतीच्या योजना राबवत अनेक मार्गाने मदतीचे काम उभे केले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल बावीच्या जागर फाउंडेशनने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे. 

हेही वाचाः सोलापूर जिल्ह्यातील 36 हजार शेतकऱ्यांना बांधावर मिळाली खते, बियाणे 

भाऊसाहेब आंधळकर यांनी लाॅकडाउनच्या काळात बार्शी शहर व परिसरात राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालयाच्या माध्यमातून दररोज अनाथ गरजूंना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली.  तसेच भूमिपुत्र अभियान, बेरोजगार तरुणांना ऑनलाइन नोकरी मेळावे घेतले. परप्रांतीयांना मायदेशी परतण्यासाठीची उपाययोजना केल्या.  गरीब गरजू कुटुंबांतील मुले दत्तक घेऊन पालकत्व स्वीकारले. त्यांच्या या कार्याची दखल घेत  बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर यांना जागर फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था, बावी यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 

हेही वाचाः एकाच जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिकांच्या सवलतीत प्रशासनाकडून होतोय दुजाभाव 

भाऊसाहेब आंधळकर हे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामजीक कामात लक्ष घातले. "अन्नदान हेच श्रेष्ठ दान' समजून संचारबंदीच्या काळात ऊसतोडणी कामगार, परप्रांतीय, अनाथ, गरजूंना राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रालयाच्या माध्यमातून जेवणाचे डबे पुरविण्यात आले. आतापर्यंत तीन लाख 21 हजार जेवणाचे डबे पुरवत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 
मागील तीन वर्षांपासून हे अन्नछत्र अविरतपणे गोरगरीब जनतेच्या सेवेत कार्य करत आहे. आंधळकर यांनी बेरोजगार तरुणांना ऑनलाइन नोकरी मेळावे घेत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. संचारबंदीच्या काळात परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी स्वखर्चाने उपाययोजना देखील केली. त्यांना बसगाड्याची सोय करून देत गावी सुखरूप पोचवण्याचे काम केले. 
तसेच अन्नछत्रालयाच्या माध्यमातून अनेक हातांना रोजगार उपलब्ध करून दिला. अशा विविध प्रकारच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी रमेश घोलप यांच्या प्रेरणेने कार्यरत असलेल्या जागर फाउंडेशनच्या वतीने मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व पांडुरंगाची मूर्ती देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उमेश घोलप, विशाल घोलप, समाधान घोलप, महादेव कोकरे-पाटील, अमोल कुलकर्णी, विशाल चिपडे आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The support of that retired police officer to those in need in the Corona crisis