धक्कादायक! ताप आलेल्या कैद्याच्या वार्डात ठेवला संशयित रुग्ण; चार दिवसांनी कैदी कोरोना पॉझिटिव्ह

तात्या लांडगे
मंगळवार, 26 मे 2020

सोलापुरातील एमआयडीसी परिसरातील  चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगार दोन महिन्यांपूर्वी  जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल झाला. 22 मे रोजी त्याला ताप असल्याने तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची सुटका केली असून त्याच्यावर जनरल रुग्णांप्रमाणे ट्रीटमेंट करावी, असे पत्र रुग्णालयाच्या प्रशासनास दिले. त्याला पाहण्यासाठी गेल्यानंतर त्याच वॉर्डांमध्ये कोरोना संशयित रुग्णाला ठेवले होते. दरम्यान 25 मे रोजी तो कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रुग्णालयाने कळविले या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तुरुंगातील 317 कैद्यांची मेडिकल तपासणी केली जाणार आहे. तत्पूर्वी, कारागृहातील कोणत्याही कायद्यात कोरोनाची लक्षणे नाहीत.
- डी. एस. इगवे, कारागृह अधिक्षक, सोलापूर 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्यास ताप आल्यानंतर उपचारासाठी त्याला 22 मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 25 मे रोजी तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, कैदी ज्या वार्डमध्ये ठेवला होता त्याच ठिकाणी अन्य संशयित रुग्ण उपचार घेत होते. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी तुरुंगात दाखल झालेल्या या कैद्यास नेमकी कोरोनाची लागण झाली कुठे, याचा शोध सुरू झाला आहे. या संदर्भात शासकीय रुग्णालयातील संबंधितांशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. 

कोरोना या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमानुसार नियमितपणे कैद्यांची देखरेख केली जात आहे. अद्याप कोणताही कैरी कोरोनाबाधित नसून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. तत्पूर्वी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी दोन महिन्यापूर्वी तुरुंगात दाखल झाला होता. 22 मे रोजी त्याला ताप आल्याने वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर चार दिवसांनी समजले की, तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे या कैद्यास कोरोनाची लागण नेमकी झाली कुठे याचा उलगडा होणे आवश्यक आहे, असेही इगवे म्हणाले.

सोलापूर मध्यवर्ती कारागृहातून सोडले 84 कैदी
सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात एकूण 401 कैदी होते. कोरोनाच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तुरुंगातील 84 कैदी आतापर्यंत पॅरोलवर सोडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत तुरुंगात 317 कैदी आहेत. खबरदारी म्हणून  तुरुंगात  सोशल डिस्टन्ससह अन्य नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे. दरम्यान, 22 मे रोजी किरकोळ तापलेल्या अक्कलकोट परिसर एमआयडीसीतील कैद्यास सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्याला उपचारासाठी एका वॉर्डमध्ये ठेवले होते आणि त्याच वॉर्डात दुसरा एक कोरणार संशयित रुग्ण असल्याचे पहायला मिळाले. आता या कैद्यास कोरोनाची लागण नेमकी कशी झाली याचा शोध घेण्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविले जाईल, असेही तुरुंग अधीक्षक इगवे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected patient placed in inmate's ward with fever Four days later the prisoner corona positive