अखेर "स्वाभिमानी'चे आंदोलन आठव्या दिवशी स्थगित ! मागण्या पूर्ण करण्याची दिली "दामाजी'ने लेखी हमी 

हुकूम मुलाणी 
Wednesday, 23 December 2020

श्री संत दामाजी सहकारी कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. आज (बुधवारी) संघटनेचे पदाधिकारी व कारखान्याच्या संचालकांमध्ये झालेल्या बैठकीतून कार्यकारी संचालकाने एफआरपीची रक्कम आठ दिवसात व मागील थकीत 74 रुपयांचे बिल लवकरच देण्याबाबत दिलेल्या लेखी पत्रानुसार "स्वाभिमानी'ने आठव्या दिवशी हे आंदोलन स्थगित केले. 

मंगळवेढा (सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. आज (बुधवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व दामाजी कारखान्याच्या संचालकांमध्ये समझोत्याची बैठक झाली. या बैठकीतून कार्यकारी संचालकाने एफआरपीची रक्कम आठ दिवसात व मागील थकीत 74 रुपयांचे बिल लवकरच देण्याबाबत दिलेल्या लेखी पत्रानुसार "स्वाभिमानी'ने आठव्या दिवशी हे आंदोलन स्थगित केले. 

या वेळी स्वाभिमानीचे पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष ऍड. राहुल घुले, दत्तात्रय गणपाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, सचिन पाटील, राजेंद्र रणे, उपाध्यक्ष शंकर संगशेट्टी, हर्षद डोरले, रणजित बागल, रोहित भोसले, राहुल खांडेकर, सुधाकर मेटकरी, अनिल बिराजदार, अनिल अंजुटगी, बाहुबली सावळे, संदीप पाटील, विजय पाटील, संदीप तळ्ळे, धनंजय पाटील, संभाजी पाटील आदींसह कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, भुजंगा आसबे, भारत निकम, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, दगडू फटे उपस्थित होते. 

जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गेला; परंतु एफआरपीप्रमाणे उसाचा दर अदा न केल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बहुतांश संघटनांनी जिल्ह्यातील अनेक कारखान्यांसमोर आंदोलने केल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साखर कारखानदारांची बैठक घेऊन ऊस उत्पादकांना एफआरपीचा निर्णय 15 डिसेंबरपूर्वी घ्यावा, अशा सूचना दिल्या. शेतकऱ्यांना एफआरपी व मागील गळीत हंगामातील 74 रुपये बिल न दिल्याच्या कारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी कार्यकारी संचालकांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती, साखरेचे दर, साखर उतारा पाहता एफआरपीची रक्कम व उर्वरित बिल लवकर देण्याबाबत ठेवलेला प्रस्ताव संघटनेने अमान्य केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केल्यावर त्याबाबतचा अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवण्यात आला. संचालकांनी देखील ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याच्या सूचना दिल्या. शेवटी आठव्या दिवशी यात तोडगा निघाल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani stopped the agitation after the Damaji factory gave a written guarantee to meet the demands