अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना आजारपणातही मदत करणाऱ्या स्वाती फुटाणे 

संतोष सिरसट
Tuesday, 20 October 2020

कोरोनाच्या काळात पालकांना मदत 
यापूर्वी केलेल्या सामाजिक कामापेक्षा कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कामाचा मला आनंद आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या अध्यापनाबरोबरच त्यांच्या पालकांना वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देत होते. त्याचबरोबर त्या काळात खाण्यासाठी आवश्‍यक असलेले रेशन दुकानावरील धान्य केव्हा मिळणार याबाबतची माहितीही पालकांना देत होते. त्याचा वेगळाच आनंद मिळत होता. कोरोनाच्या काळात जगण्यासाठी आवश्‍यक असलेले धान्य कधी मिळणार याची माहिती मिळतेय म्हटल्यावर त्याचा पालकांनाही आधार वाटत होता. 
स्वाती फुटाणे, शिक्षिका, महापालिका शाळा क्रमांक सहा. 

सोलापूर ः लहान मुलांचे नाते हे आई-वडील व शिक्षकांशी अतिशय जिव्हाळ्याचे असते. वयाच्या तीन-चार वर्षानंतर मुल हे आई-वडिलांपेक्षा शिक्षकांच्या सहवासामध्ये जास्तवेळ राहते. त्यामुळे आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकही त्या मुलांचे आई-वडिलच होतात. महापालिकेच्या शाळा क्रमांक सहामध्ये कार्यरत असलेल्या स्वाती फुटाणे या शिक्षिका आपल्या वर्गातील मुलांना अध्यापन करण्याबरोबरच त्यांचे आजारपणही मोठ्या मनाने करतात. हे करत असताना त्या मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही मदत करत सामाजिक भान जपत असल्याचे दिसून येते. 

समाजामध्ये चांगले गोष्टीचा फारसा गवगवा होत नाही. वाईट गोष्टी ऐकण्याकडे व पाहण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. पण, चांगल्या, समाज उपयोगी गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. जोडबसवण्णा चौकात असलेल्या महापालिकेच्या शाळा क्रमांक सहामध्ये स्वाती फुटाणे या आठ-दहा वर्षापूर्वी अतिरिक्त शिक्षक म्हणून रुजू झाल्या. यापूर्वी त्यांनी सोलापूर येथील एका मूकबधीर शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते. त्या शाळेत काम करताना मूकबधिर विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यावर त्यांनी जोर दिला. मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना समाजामध्ये चांगले स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर शासनाने हा प्रकल्प काही कारणास्तव रद्द केला. त्यामुळे त्या शाळेत अतिरिक्त झालेल्या फुटाणे यांचे समायोजन महापालिकेच्या शाळेत झाले. महापालिकेच्या शाळा व मूकबधीर विद्यार्थ्यांची शाळा यामध्ये खूप तफावत होती. दोन्ही शाळेतील मुलेही वेगवेगळी होती. महापालिकेच्या शाळेत येणारी मुले ही झोपडपट्टीतील व कामगारांची मुले आहेत. त्या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्या आजारपणापणातही स्वाती फुटाणे या विद्यार्थ्यांना मदत करायच्या. केवळ अध्यापनापुरतेच नाही तर त्यांचे व विद्यार्थ्यांचे वेगळेत नाते निर्माण झाले आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून शाळा बंद झाल्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या. जूननंतर नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले खरे पण शाळा सुरुच झाल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देणे सुरु झाले. त्याप्रमाणे महापालिकेतील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम फुटाणे या करत आहेत. महापालिकेतील शाळेत मुलांना आणण्यासाठी सर्व शिक्षकांनी स्वखर्चातून गाडी भाड्याने केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swati Phutane who helps students in illness as well as teaching