गटप्रमुख, सर्व उमेदवार जवळचे नातेवाईकच ! तडवळेच्या मतदारांची मात्र वाढली डोकेदुखी 

grampanchyat_nivdnuk
grampanchyat_nivdnuk

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील तडवळे ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी तीन वॉर्डात 24 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. गावातील तीनही प्रमुख पॅनेलप्रमुख व उमेदवार हे जवळचे आप्त, नातेवाईक, मित्र व सगेसोयरे आहेत. त्यामुळे मतदान कोणाला द्यायचे, या संभ्रमात गावातील मतदार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मधल्या मध्ये त्यांची डोकेदुखी वाढली आहे. बार्शी तालुक्‍यात लक्षवेधी ग्रामपंचायत निवडणूक म्हणून याकडे सर्वच राजकीय पक्षप्रमुखांचे लक्ष लागले आहे. 

बार्शी तालुक्‍यात 95 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडत आहेत. तडवळे येथे लोखंडे, आवारे व जाधव या तीन प्रमुख पॅनेलमध्ये ही लढत होत आहे. गावातील तीन वॉर्ड संख्या असलेल्या नऊ जागांसाठी 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत तीनही पॅनेलने निवडून येणारे उमेदवार शोधले असले तरी बारा बलुते, अठरा पगड जाती - धर्माचे लोक येथे राहतात. तीनही गटांचे पॅनेल प्रमुख म्हणून असलेले लोखंडे, जाधव, आवारे, नवले हे उमेदवार कुटुंबांचे जवळचे नातेवाईक असल्याने कोणता पाहुणा धरायचा, त्या वॉर्डात कोणता उमेदवार निवडून आणायचा, असे तर्क - वितर्काचे प्रश्न मतदारांना निर्माण झाल्याचे एका मतदाराने सांगितले. 

एकमेकांच्याच मतांवर उमेदवार निवडून येत असतो. त्यात कोणाला धरावे व कोणाला सोडावे, हे मात्र सध्या मतदारांना कळेनासे झाले आहे. तसेच पॅनेल प्रमुखांकडून सोशल मीडियाचा आधार घेऊन अधिकचा प्रचार केला जात आहे. याबरोबरच मतदारांची भेट घेऊन ओळख पटवून देण्यावरही उमेदवारांनी भर दिल्याचे दिसून येत आहे. मतदारांच्या भेटीत विविध आश्वासने देऊन आपल्याकडे मतदारांचा कल वळवण्यावर उमेदवार व पॅनेल प्रमुख कामात व्यस्त झालेत. 

तिन्ही पॅनेल प्रमुखांच्या राजकीय भवितव्याचा फैसला 
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटाकडून बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापती व सरपंच रिता लोखंडे, त्यांचे पती माजी सरपंच रामकृष्ण लोखंडे यांनी यशवंत ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार दिले आहेत. आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाकडून सेवानिवृत्त मेजर संजय आवारे व माजी सरपंच वर्षकेतू जाधव, माजी सरपंच सुहास आवारे यांनी युती करत जय भवानी यशवंत परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर भाजपचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्या समर्थकांचे किरण जाधव व दलित मित्र बाळासाहेब कोरके यांचे समर्थक बाळासाहेब आवारे यांच्या जय जगदंबा - जनशक्ती ग्रामविकास आघाडी यांच्यात सरळ व लक्षवेधी तिरंगी लढत होत आहे. 

अशी लढली खेळी 
येथे तीन वॉर्ड संख्या आहे. दोन हजार 542 मतदार संख्या आहे. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये चुलत दीर-भावजय असलेले माजी सरपंच रवींद्र बनसोडे यांच्या विरोधात मनीषा बनसोडे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. मतदारांच्या जमेचा आकडा पाहत लोखंडे यांच्या पॅनेलने प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवार उभे न करता व जाधव यांच्या पॅनेलमधून याच प्रभागात एक उमेदवार उभा न करता केलेली राजकीय खेळी यशस्वी होणार का? या ग्रामपंचायतीत पारंपरिक वर्चस्वाला धक्का बसणार का? आदी प्रश्नांसह येथील मतदार तिरंगी लढतीमुळे संभ्रमात पडला आहे. 

नशीब आजमावणारे उमेदवार 

  • तडवळे ग्रामपंचायत निवडणुकीत लोखंडे गटाकडून अमरसिंह लोखंडे, सुलक्षणा पाटेकर, अश्विनी बोडके, चित्रा लोखंडे, संजय दावणे, सुमन आवारे, मनीषा बनसोडे हे उमेदवार लढत आहेत. 
  • आवारे-जाधव-आवारे यांच्या पॅनेलमधून सुहास आवारे, जयश्री खंडागळे, सुशीला नवले, गणेश आवारे, इंदुमती जाधव, जयश्री कोळी, गोरख गायकवाड, रवींद्र बनसोडे, काशीबाई गायकवाड हे मैदानात आहेत. 
  • जाधव-आवारे गटाकडून बाळासाहेब आवारे, जयश्री पिसके, सुवर्णा नवले, मदन लोखंडे, मीना स्वामी, पद्मिनी जाधव, नितीन बनसोडे, काकासाहेब दावणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com