
करमाळा (सोलापूर) : गावातील तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाल्याने गावात तलाठी व मंडल अधिकारी आले तर त्यांनी बसायचे कुठे? या अनेक वर्षांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबवत मार्ग काढला आहे.
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तर तलाठी कार्यालय तर गावातच असले पाहिजे, या संकल्पनेतून उमरड (ता. करमाळा) येथे लोकवर्गणीतून तलाठी कार्यालय बांधण्याची संकल्पना करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी मांडली. याला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला अन् तलाठी कार्यालय बांधण्याच्या कामाचा प्रारंभ मंगळवारी (ता. 16) तहसीलदार माने यांच्याच हस्ते करण्यात आला.
येत्या दोन महिन्यांत उमरड येथे सुसज्ज असे तलाठी कार्यालय बांधून पूर्ण करण्याचा संकल्प या वेळी ग्रामस्थांनी बोलून दाखवला. या तलाठी कार्यालयासाठी सर्व गटा- तटाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. सर्वांनी एकत्र येत गावातच तलाठी कार्यालय बांधण्याची संकल्पना मांडल्याने हा एक वेगळा आदर्श उमरड ग्रामस्थांनी दिला आहे.
या वेळी आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, तानाजी झोळ, नायब तहसीलदार सुभाष बदे, बापू चोरमले, मंडल अधिकारी संतोष गोसावी, माजी सरपंच प्रमोद बदे, गावकामगार तलाठी साईनाथ आडगटळे, तलाठी बिजले, डी. जी. बदे, पोलिस पाटील अंकुश कोठावळे, नंदकुमार वलटे, संदीप बदे आदी उपस्थित होते.
उमरड हे गाव उजनी बॅकवॉटर परिसरात येत असून, या गावातील 90 टक्के भाग हा उजनी धरणावर आधारित बागाईत क्षेत्रामध्ये मोडला जातो. मात्र या गावात तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाल्याने तलाठी व मंडल अधिकारी यांना बसण्यासाठी जागा नसल्याने गैरसोय होत होती. याबाबत उमरड येथे तलाठी कार्यालय बांधण्यासंदर्भात तहसीलदार समीर माने यांनी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर लोकसहभागातून तलाठी कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
उमरड ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेऊन येथे तलाठी कार्यालय असले पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. मात्र तलाठी कार्यालय बांधायचे कसे? याबाबत उमरड ग्रामस्थांशी चर्चा केली. तेव्हा उमरड ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे लोकवर्गणीतून कार्यालय बांधण्याचे ठरवले. खरं तर हा एक वेगळा आदर्श ग्रामस्थांनी दिला आहे.
- समीर माने,
तहसीलदार, करमाळा
उमरड गावात जे तलाठी कार्यालय आहे त्याची दुरवस्था झाली आहे. उजनी परिसरात उमरड गाव असल्याने गावाची आर्थिक उलाढाल फार मोठी आहे. गावात तलाठी कार्यालय नसल्याने शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तहसीलदार समीर माने यांनी लोक सहभागातून तलाठी कार्यालय बांधण्याची संकल्पना आमच्यासमोर मांडली. त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
- वामनराव बदे,
उमरड, ता. करमाळा
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.