बळिरामकाकांसोबत कोठे जाणार शरद पवारांच्या भेटीला ! तौफिक शेख अन्‌ कोठेंचा ठरला राष्ट्रवादी प्रवेश 

Kothe_Shaikh
Kothe_Shaikh

सोलापूर : शहरातील राजकारणात "एमआयएम'च्या माध्यमातून फारूक शाब्दी यांनी प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत शाब्दी यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक मते मिळविली. पक्षाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे नाराज झालेले तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी सोमवारी (ता. 4) उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचीही भेट घेतली. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन तौफिक शेख हे आपल्या नगरसेवकांसह सोलापुरातच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापालिकेच्या राजकारणात बरेच बदल होऊ लागले आहेत. तौफिक शेख यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या वेळी तौफिक यांच्यासोबत पूनम बनसोडे, नूतन गायकवाड, तस्लिम शेख, शाहजीदाबानो शेख, वाहिदाबी शेख हे नगरसेवक उपस्थित होते. मात्र, प्रोटोकॉलनुसार अधिकृत प्रवेश करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांची वेळ घेणे महत्त्वाचे असल्याने त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. 

दुसरीकडे, शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे हेदेखील काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपचे अडचणीत आलेले उपमहापौर यांच्या जागी दुसऱ्या नगरसवेकाचा शोध पक्षाने सुरू केल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे, शिवसेनेचा महापालिकेतील विरोधी पक्षनेताही बदलण्याचे निश्‍चित झाले आहे. 

"एमआयएम'ची ताकद विभागली 
महापालिकेत "एमआयएम'चे नऊ नगरसेवक असून, एक स्वीकृत नगरसेवक आहे. दहा नगरसेवकांची ताकद घेऊन तौफिक शेख यांनी महापालिकेत शहरातील विविध प्रश्‍नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, पक्षातील अंतर्गत वादामुळे तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्धार केला. पदवीधर व शिक्षक आमदारीकी वेळी त्यांनी महाविकास आघाडीला मदत केली, तर विषय समित्या निवडीतही त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत जाण्याचे नियोजन केले असतानाच चार नगरसेवकांनी पक्ष न सोडण्याचे ठरविले आहे. त्यात एमआयएमचे गटनेते रियाज खरादी, स्वीकृत नगरसेवक गाझी जहागीरदार, अजहर हुंडेकरी आणि वाहिदाबानो भंडाले यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. 

महेश कोठेंचा राष्ट्रवादी प्रवेशातील अडथळा दूर 
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर महेश कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळी काही नगरसेवकांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोठे यांनी विभागीय आयुक्‍तांकडे केली होती. त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश रखडला होता. काही दिवसांपूर्वी कोठे यांनी विभागीय आयुक्‍तांची भेट घेऊन तो मुद्दा क्‍लिअर केला आहे. तत्पूर्वी, महेश कोठे यांनी आमदार संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांची सातत्याने भेटीगाठी केल्या. आता विभागीय आयुक्‍तांकडील प्रलंबित प्रश्‍न सुटला असून, कोठे यांना घेऊन आपण चार-पाच दिवसांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहिती बळिराम साठे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. लवकरच कोठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्‍त केला. 

"शहर उत्तर'वर महेश कोठेंचा डोळा 
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून आपल्याला संधी मिळणार नाही, याची खात्री कोठे यांना झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर उत्तर हा मतदारसंघ आपल्यासाठी रास्त राहील, असा विश्‍वासही कोठे यांना वाटू लागला आहे. त्यामुळे शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आपण निवडणूक लढवू शकतो, या हेतूने कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com