
शहरातील सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकाने, उपमुख्याध्यापिकेच्या हस्ते शाळेचे ध्वजवंदन होणार असेल तर शाळेतच पेटवून घेईन, अशी धमकी प्राचार्यांना देताच प्राचार्यांनी संस्थेच्या सचिवांच्या हस्ते ध्वजवंदन उरकले. संस्थेच्या परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी (सोलापूर) : शहरातील सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकाने, उपमुख्याध्यापिकेच्या हस्ते शाळेचे ध्वजवंदन होणार असेल तर शाळेतच पेटवून घेईन, अशी धमकी प्राचार्यांना देताच प्राचार्यांनी संस्थेच्या सचिवांच्या हस्ते ध्वजवंदन उरकले. संस्थेच्या परिसरात जातिवाचक शिवीगाळ करून लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सुशील पाटील (रा. लोखंड गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव असून, उपमुख्याध्यापिका माधुरी गोलकोंडा यांनी बुधवारी रात्री बारा वाजता फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी सुलाखे हायस्कूल परिसरात घडली.
फिर्यादीत म्हटले की, प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी सुलाखे हायस्कूल येथील ध्वजवंदन तुमच्या हस्ते होणार आहे, असे पत्र उपमुख्याध्यापिका माधुरी गोलकोंडा यांना प्राचार्य अण्णासाहेब पाटकुलकर यांनी 23 जानेवारी रोजी दिले होते. त्यानुसार ध्वजारोहणासाठी शाळेच्या परिसरात येताच प्राचार्यांनी फोन करून सांगितले, की तुमच्या हस्ते ध्वजारोहण होऊ शकत नाही. मी ऑफिसमध्ये येत आहे, चर्चा करू. त्या वेळी ऑफिसबाहेर येऊन प्राचार्यांनी मला थांबवले. शाळेतील शिक्षक सुशील पाटील मला म्हणाला आहे की, बाईच्या हस्ते ध्वजारोहण केले तर मी पेटवून घेईन. त्यामुळे प्राचार्यांनी संस्थेचे सचिव कवठाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले व मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ठेवले.
शाळेतील वाहनतळावर वाहन घेण्यास गेले असता सुशील पाटील माझ्यामागे आला व जातिवाचक, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लज्जास्पद वर्तन केले. "आता कसं वाटतंय, तुझ्या हस्ते ध्वजारोहण करू दिले नाही. आता बघ तुझा पिक्चर लावतो' असे म्हणून निघून गेला. यापूर्वीही संधी मिळेल तेव्हा घाणेरडे शब्द वापरतो, माझ्याकडे वाईट नजरेने बघतो, ऑफिसमधून बाहेर ये, असे बोलतो, तू मुलींची बाजू घेतेस का, तुझा पद्धतशीर काटा काढतो तू बघ, अशी धमकी देतो. शाळेत खिचडीची चव घेतली तर भिकारडी कशी खिचडी खाते बघा, असे म्हणतो.
सुशील पाटील याने मागील वर्षी माझे वेतन त्याच्या तक्रारीने थांबविले. ते रीतसर सुरू झाल्याने चिडून, तुझा बंदोबस्तच करतो म्हणत असल्याने त्याच्यापासून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हवालदार अरुण माळी करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल