शाळा सोडलेला मुलगा झाला सैन्यात मेजर तर दुसरा मॅनेजर! शिक्षिका वैशाली डोंबाळे यांनी दिला मदतीचा हात

तात्या लांडगे 
Saturday, 24 October 2020

श्री दत्त बालमोहन विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली डोंबाळे यांनी सांगितले की, कुटुंबातील मुलांप्रमाणेच विडी घरकूल परिसरातील मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन त्यांना स्पर्धा परीक्षांचीही माहिती दिली. त्यातून दोन मुले पोलिस उपनिरीक्षक पदांपर्यंत पोहचली. ता शाळेत काहीजण शिक्षक असून एक पुण्यातील खासगी कंपनीत व्यवस्थापक आहे. 

सोलापूर : आई आजारी, वडील नाहीत आणि डोळ्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न असलेल्या निराधार मुलांना शिक्षणाची गोडी लावणे. गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या मोफत देऊन त्यांनी शिक्षणाचे धडे देणे. अशी सामजिक बांधिलकी जपली आहे, आजच्या नवदुर्गा वैशाली डोंबाळे यांनी. त्यांनी आतापर्यंत सुमारे अडीच हजार मुलांना शिक्षण दिले आहे. परिस्थितीने नडलेल्या चिमुकल्यांना दत्तक घेऊन उच्च शिक्षणापर्यंत मदतीचा हात दिला. त्यातून काही मुले, शिक्षक, सैन्यात, पोलिस दलात तर काहीजण मूर्तीकार, खासगी कंपनीत उच्च पदावर काम करीत आहेत. 

 

विडी घरकूल परिसरातील मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने 1970 मध्ये श्री दत्त बालमोहन विद्यालयाची सुरवात झाली. 2001 मध्ये वैशाली डोंबाळे या त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून रुजू झाल्या. नेचर फाउंडेशनमध्येही त्यांचा सहभाग आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी कुचन नगर, भगवान नगर, विडी कामगार वस्तीतून येणाऱ्या मुलांना सर्वोतोपरी मदत केली. शाळा सोडण्याचा विचार करणाऱ्या मुलांना तथा त्यांच्या पालकांना प्रबोधन करुन शाळेची गोडी लावली. त्यामुळे शिक्षणाची आवड असलेली मुले मोठ्या पदांपर्यंत पोहचण्यात आपला खारीचा वाटा असल्याचा आनंद वाटतो, अशी भावना सौ. डोंबाळे यांनी व्यक्‍त केली. 

"हे' आठवणीतील क्षण 

इयत्ता पाचवीत शिक्षण घेणाऱ्या आकाश नावाच्या मुलाचे वडील कर्करोगाने मयत झाले. त्याला तीन बहिणी होत्या, त्यातील एकीचा विवाह झाला नव्हता. अशा परिस्थितीत आईने कुटुंबासाठी हातभार लागावा म्हणून आकाशची मदत घ्यायची ठरविली. त्यानंतर आकाशचे शाळेत जायचे बंद झाले. शिक्षकांनी आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करुनही ती ऐकत नव्हती. त्यानंतर वैशाली डोंबाळे यांनी त्याच्या मामाकडे धाव घेतली आणि आकाशचा पुन्हा शाळेत प्रवेश झाला. त्यानंतर आकाशने उच्च शिक्षण घेतले आणि आता तो पुण्यातील खासगी कंपनीत व्यवस्थापक आहे. दुसरीकडे सैन्यात मेजर असलेला मुलाची आई सारखी आजारी असायची, वडील दारु पित होते. तो कधी- कधी शाळेत यायचा, त्याच्या मनात शाळा सोडण्याचा विचार आला. मात्र, आम्ही मदत करुन त्याला शिकविले, उच्च शिक्षणासाठी मदत केली आणि आता तो सैन्यात मेजर म्हणून कार्यरत असल्याची आठवण सौ. डोंबाळे यांनी कथन केली. 

श्री दत्त बालमोहन विद्यालयाच्या शिक्षिका शिक्षिका वैशाली डोंबाळे यांनी सांगितले की, कुटुंबातील मुलांप्रमाणेच विडी घरकूल परिसरातील मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन त्यांना स्पर्धा परीक्षांचीही माहिती दिली. त्यातून दोन मुले पोलिस उपनिरीक्षक पदांपर्यंत पोहचली. ता शाळेत काहीजण शिक्षक असून एक पुण्यातील खासगी कंपनीत व्यवस्थापक आहे. 

महाराष्ट्र : सोलापूर 
 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Vaishali Dombale gave a helping hand! The boy who dropped out of school became a major in the army and another a manager