शिक्षकदिन विशेष : सुरवसे गुरुजींनी केली 75 हून अधिक इंग्रजी शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती 

संतोष सिरसट 
Saturday, 5 September 2020

शिक्षक राहुल सुरवसे यांनी ऑनलाइन गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांकडून मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यासाची चाचणी सोडवून घेतली. चाचणीमध्ये दिलेल्या प्रतिसादात काही चुका झाल्या असतील तर त्यांची दुरुस्ती त्याच ठिकाणी पाहता येईल अशी रचना त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली होती. राहुल सुरवसे या नावाने यू-ट्यूब चॅनेलवर अभ्यासाशी निगडित ऍनिमेशनवर आधारित रंजक पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती त्यांनी केली. 

सोलापूर : कोरोनाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राहुल सुरवसे यांनी जिल्हा परिषद शाळा, कुंभारवस्ती-आंदेवाडी (ता. अक्कलकोट) येथे शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी गेल्या सहा महिन्यांत विविध उपक्रम राबविले आहेत. कर्नाटक सीमेलगत त्यांची शाळा आहे. त्यांनी पहिल्यांदा पालकांचे व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून शैक्षणिक अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले. काही पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे मुलांना अभ्यासासाठी व्हॉईस कॉलद्वारे संवाद साधला. त्यांना अभ्यासाचे नियोजन दिले. त्याचा पाठपुरावा सुरवसे यांनी केला. 

ऑनलाइन गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांकडून मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यासाची चाचणी सोडवून घेतली. चाचणीमध्ये दिलेल्या प्रतिसादात काही चुका झाल्या असतील तर त्यांची दुरुस्ती त्याच ठिकाणी पाहता येईल अशी रचना त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली होती. राहुल सुरवसे या नावाने यू-ट्यूब चॅनेलवर अभ्यासाशी निगडित ऍनिमेशनवर आधारित रंजक पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओंची निर्मिती त्यांनी केली. त्यासाठी ट्विन क्राफ्ट, काईनमास्टर, कॅमटेशिया अशा ऍप्लिकेशनचा वापर केला. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्या प्रेरणेने व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या यू-ट्यूब चॅनेलवर आजपर्यंत 75 हून अधिक इंग्रजी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती व एडिटिंगमध्ये काम करण्याची संधी सुरवसे गुरुजींना मिळाली आहे. 

विद्यार्थ्यांसाठी वापरतात स्वाध्यायमालाही 
ज्या विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्रॉईड मोबाईल नाहीत त्यांच्यासाठी विजयकुमार वसंतपुरे या शिक्षकाने तयार केलेली ऑफलाइन कोविड स्वाध्यायमाला वापरली जाते. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना जुलै ते सप्टेंबर या कालावधीची अभ्यास स्वाध्यायमाला वितरीत करून विद्यार्थ्यांकडून अभ्यासाचा आढावा शाळा स्तरावर घेण्याचे काम सुरवसे करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Day : English educational videos made by teacher Suravase