50 दिवसांनंतरही सुटेना शिक्षकांची कोरोना ड्यूटी

41teacher_27_20_20Copy_1.jpg
41teacher_27_20_20Copy_1.jpg

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने महापालिका प्रशासनाने घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम हाती घेतले. त्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्रत्येक शिक्षकांना 30 दिवसांची कोरोना ड्यूटी सक्‍तीची केली. मात्र, 40 ते 55 दिवसांची ड्यूटी करुनही सुमारे पाचशे शिक्षकांना कार्यमुक्‍तीचे आदेश मिळालेले नाहीत.

को-मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरु नयेत, लक्षणे असलेल्या रुग्णांचे तत्काळ निदान व्हावे म्हणून घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे. शहरात 12 एप्रिलला पहिला कोरोना रुग्ण आढळला. सद्यस्थितीत शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर पोहचली आहे. तर मृतांची संख्या 503 झाली आहे. तत्पूर्वी, सोलापूर शहराचा मृत्यूदर राज्यातच नव्हे तर देशात अव्वल होता. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन आयुक्‍त दिपक तावरे यांनी शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आतापर्यंत तीनवेळा सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात आली. एकाच शिक्षकांना दोनदा कोरोना ड्यूटी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे दीड हजारांहून अधिक शिक्षकांना एकदाही ड्यूटी मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन उपायुक्‍त पंकज जावळे यांनी शिक्षकांना कामाचे समसमान वाटप व्हावे म्हणून शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार प्रत्येकाला 30 दिवसांची ड्यूटी देऊन त्यांच्या कार्यमुक्‍तीचे निकष ठरविले. मात्र, तरीही त्यानुसार अंमलबजावणी न होता, 50 दिवसांहून अधिक ड्यूटी करुनही साडेपाचशे शिक्षकांना ड्यूटीतून कार्यमुक्‍ती मिळालेली नाही. आता शिक्षकांना सर्व्हेसोबतच ऑनलाइन माहिती भरणे, डेंगीचा सर्व्हे करणे अशी कामे लावली जात असल्याने ते वैतागले आहेत.


30 दिवसांहून अधिक ड्यूटी केलेल्यांची यादी तयार 
कोरोना काळात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षक घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम करीत आहेत. प्रत्येकांना काम करण्याची संधी मिळावी, काही ठरावीक शिक्षकांवरच अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार आता 30 दिवसांहून अधिक ड्यूटी केलेल्यांची (21 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर) यादी तयार केली जात आहे. 
- कादर शेख, प्रशासन अधिकारी, महापालिका 


बदली शिक्षकांचा घेतला जातोय शोध
कोरोनाच्या महामारीत शहरातील कुटुंबांचा सर्व्हे करण्यासाठी शिक्षकांना नियुक्‍त करण्यात आले असून ड्यूटी नाकारणाऱ्यांना आता बिनपगारी सक्‍तीची रजा दिली जाणार आहे. तर दुसरीकडे ड्यूटीचे आदेश देऊनही हजर न झालेल्यांचे वेतन काढू नये, असे पत्र वेतन अधीक्षकांना देण्यात आले आहे. शहरातील साडेतीन हजारांहून अधिक शिक्षकांपैकी सोळाशे शिक्षकांनी आतापर्यंत सर्व्हेचे काम केले आहे. उर्वरित शिक्षकांपैकी काहींनी आजारपणाचे कारण दिले असून काहींनी वय जास्त असल्याचे म्हटले आहे. तर मुख्याध्यापकांना काम असल्याने त्यांना ड्यूटीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता कार्यमुक्‍त केलेल्या शिक्षकांच्या जागेवर नियुक्‍त होणाऱ्या शिक्षकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com