पूरग्रस्त पीरटाकळीच्या शिक्षकांनी दिला ग्रामस्थांना मदतीचा हात 

अश्‍पाक बागवान 
Sunday, 25 October 2020

बेगमपूर (सोलापूर) ः सीनेच्या महापुराने गावाला वेढा दिला होता... शेतातील वस्ती व गावात राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाण्याने शिरकाव केला होता... शेतातील उभी पिके पाण्याखाली आली... होत्याचे नव्हते झाले...अनपेक्षीतरित्या उद्‌भवलेल्या या नैसर्गिक संकटाने अनेकांचे संसार उघड्यावर आणले. पूरग्रस्तांना "तत्काळ' मदत देण्यापासून प्रशासनही चार हात दूरच राहिले. पण, अशा स्थितीत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवत पूरग्रस्तांना जीवनावश्‍यक वस्तूचे वाटप केले अन शिक्षक व समाज यांच्या नात्याची वीण दृढ केली. 

सीना नदी काठावरील पीरटाकळी (ता. मोहोळ) हे पुरग्रस्त गाव. पुराच्या पाण्यामुळे गावाला वेढा दिल्याने अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीपर्यंत 114 विद्यार्थी पट आहे. विशेष म्हणजे 2019 पासून या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची फी वा शाळेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचा कसलाच खर्च घेतला जात नाही. जून 2029 मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांला शाळेची बॅग, बूट, गणवेश, वहीसह स्वच्छतेसाठी आवश्‍यक अशा 17 प्रकारचे साहित्य शाळेच्या पहिल्या दिवशी देऊ केले होते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ज्ञानादानाबरोबरोच शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारलेल्या या शिक्षकांनी पूरग्रस्तांनाही मदतीचा हात देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शेतातील उभी पिके पाण्याखाली आली. कामगार, शेतमजूरापुढे बिकट प्रसंग उदभवला. यावेळी मदत म्हणून खारीचा वाटा उचलत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत 11 हजाराची रक्कम जमा केली व या रकमेतून गहू, दाळ, तांदूळ, साखर, चहा आदी दहा विविध प्रकारच्या जीवनावश्‍यक वस्तूची खरेदी करून त्या गरजूंना उपलब्ध करून दिल्या. युवा कार्यकर्ते महेश धुमाळ, उपसरपंच दीपक थिटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगताप, पोलिस पाटील शंकर पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष समाधान जाधव, माऊली पाटील, ग्रामसेविका उमाटे, तलाठी राठोड आदींच्या उपस्थितीत या साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेतील सहशिक्षक तथा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्षअनिल कादे यांनी शाळेसाठी सुमारे चार लाखाहून अधिक रक्कम खर्च करून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे मुख्याध्यापक पुंडलिक नवले यांनी सांगितले. गावातील शिक्षकांच्या या उपक्रमाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निबर्गी, केंद्रप्रमुख अंकुश कुंभार यांनी अभिनंदन केले. ग्रामस्थांवर ओढवलेल्या संकटकाळी गुरुजनांनी केलेल्या मदतीचे अनेकांकडून कौतुक होत आहे. मुख्याध्यापक पुंडलिक नवले, अनिल कादे, गौरीशंकर खोबरे, ज्ञानेश्वर लामतुरे, गंगाधर कांबळे यांनी ग्रामस्थांना मदतीचा हात दिला. त्यांचा गौरव ग्रामस्थांनी केला. 
महाराष्ट्र  

 संपादन ः संतोष सिरसट 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers of flood-hit Pirtakali gave a helping hand to the villagers