कोरोना ड्यूटी नाकारली ! चौदा शिक्षकांना मिळणार नाही पगार 

तात्या लांडगे 
Saturday, 31 October 2020

शहरातील कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव कमी व्हावा, को- मॉर्बिड रुग्ण कोरोनापासून वाचावेत, या हेतूने घरोघरी सर्व्हेचे काम सुरू आहे. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत महापालिका क्षेत्रातील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी 633 शिक्षकांना नव्याने ड्यूटी दिली. मात्र, त्यातील 14 शिक्षक अद्याप ड्यूटीवर हजर न झाल्याचा अहवाल प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी महापालिका आयुक्‍तांकडे सोपविला आहे. 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव कमी व्हावा, को- मॉर्बिड रुग्ण कोरोनापासून वाचावेत, या हेतूने घरोघरी सर्व्हेचे काम सुरू आहे. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत महापालिका क्षेत्रातील शिक्षकांची मदत घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी 633 शिक्षकांना नव्याने ड्यूटी दिली. मात्र, त्यातील 14 शिक्षक अद्याप ड्यूटीवर हजर न झाल्याचा अहवाल प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी महापालिका आयुक्‍तांकडे सोपविला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरणाऱ्या को-मॉर्बिड रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून शहरात घरोघरी सर्व्हे केला जात असून, दररोज संबंधित व्यक्‍तीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या कामासाठी शिक्षकांची मदत घेतली जात असून, तसे आदेश महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी काढले. कोरोना ड्यूटी नाकारणाऱ्यांना यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काहींना विनावेतन रजेवर जाण्याचे आदेशही आयुक्‍तांनी काढले आहेत. कोरोना ड्यूटी करण्यासाठी तब्येत साथ देत नसेल तर विद्यार्थ्यांना काय शिकविणार, हा त्यामागे हेतू होता. तरीही 14 शिक्षकांनी ड्यूटी जॉईन केली नसून आता त्यांच्याबाबत आयुक्‍त सोमवारी (ता. 2) निर्णय घेतील, असेही कादर शेख यांनी सांगितले. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्याशिवाय वेतन 
कोरोना ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला पगार बिलास लावणे बंधनकारक करण्याचा आदेश आयुक्‍तांनी काही दिवसांपूर्वी काढला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्याशिवाय वेतन अधीक्षकांकडून पगार मिळत असल्याची चर्चा आहे. तर शहरातील 15 पैकी काही नागरी आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही महापालिका आयुक्‍तांच्या आदेशाला बगल दिल्याचे चित्र आहे. काहीजण एक- दोन तास ड्यूटी करून नोंदवहीत स्वाक्षरी करून निघून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तरीही वैद्यकीय अधिकारी काहीच कारवाई करीत नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers who refuse corona duty will not be paid