विनामास्क प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटमचा केला तहसीलदारांनी सिनेस्टाईल पाठलाग ! 

उमेश महाजन 
Thursday, 4 March 2021

विनामास्क प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटमचा सिने स्टाईलने सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग केला व त्या टमटम चालकास एक हजार रुपयांचा दंड केला.

महूद (सोलापूर) : विनामास्क प्रवासी वाहतूक करणाऱ्या टमटमचा सिने स्टाईलने सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग केला व त्या टमटम चालकास एक हजार रुपयांचा दंड केला. ही घटना महूद (ता. सांगोला) येथे घडली. आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा महसूल प्रशासनाने महूद येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला तालुका महसूल प्रशासन प्रभावी उपाययोजना करत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असतानाही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. यासाठी सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी स्वतः महूद येथे दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई केली. तहसीलदार व महसूल विभागातील कर्मचारी बुधवारी खिलारवाडी (ता. सांगोला) येथे कामानिमित्त आले होते. तहसीलदार अभिजित पाटील हे सांगोलाकडे जात असताना चौकामध्ये उभे राहिले. अधिकाऱ्यांना पाहताच विनामास्क फिरणाऱ्यांची तारांबळ उडाली. अधिकारी दिसताच काहीजण तोंडाला मास्क लावताना दिसून आले. काहीजण गाडी वळवून माघारी पळ काढताना दिसून आले. तर काहींनी अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसून आले. 

नेमका या वेळी पंढरपूरहून आटपाडीकडे एक टमटम जात होता. यामध्ये काही महिला प्रवासी, चालक आणि काही व्यक्ती होत्या. या वाहनातील कोणीही तोंडाला मास्क बांधलेला नव्हता. हे पाहून तहसीलदार अभिजित पाटील यांनी टमटम चौकात थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालक वेगाने टमटम घेऊन जाऊ लागला. तहसीलदार श्री. पाटील यांनी ताबडतोब गाडीत बसून टमटमचा सुमारे एक किलोमीटर पाठलाग केला. शेवटी टमटम अडवून वाहनचालकास उद्दामपणाबाबत खडसावले व नियम पाळण्याबाबत समज देऊन त्यास एक हजार रुपयांचा दंडही केला. 

महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अगदी थोड्या वेळात महूद येथे सुमारे दहा हजार एकशे रुपयांचा दंड वसूल केला. तर शासनाच्या वतीने मोफत मास्कचे वाटपही करण्यात आले. तहसीलदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा महूद येथे महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या वेळी मंडलाधिकारी दिनेश भडंगे, तलाठी गणेश तनमोर, गणेश भुजबळ, श्री. चाफेकर, पोलिस पाटील लहू मेटकरी यांच्यासह शिवणेचे मंडल अधिकारी, महीम, कटफळचे तलाठी उपस्थित होते. 

महूद हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत. सध्या दंडात्मक कारवाई केली जात असून, यापुढे जो कोणी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. 
- अभिजित पाटील, 
तहसीलदार, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar chased a vehicle carrying a passenger without a mask