...अखेर "त्या' वृद्ध शेतकरी दाम्पत्याची घेतली तहसीलदारांनी बांधावर भेट..! 

Old farmer couple
Old farmer couple

सासुरे (सोलापूर) : धामणगाव (ता. बार्शी) येथील सोजर व नरहरी ढेकणे या वृद्ध दाम्पत्याला शेतामध्ये दुबार पेरणीचे काम करत असतानाची बातमी "ई-सकाळ' व "ई-सकाळ' फेसबुक पेजवरून महाराष्ट्रभर झळकत आहे. त्या वृत्ताची दखल घेऊन बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी त्यांची भेट घेऊन दुबार पेरणी केलेल्या शेतात बसून त्यांची विचारपूस केली. दरम्यान, विविध शासकीय योजनांची पडताळणी करून सोजर ढेकणे यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ देण्यासंदर्भात कार्यवाही केली. 

शेतकऱ्यांच्या कष्टाला सीमाच नसते, हे खरंच. याचे ताजे उदाहरण म्हणजे धामणगाव दुमाला (ता. बार्शी) येथील 80 वर्षांचे शेतकरी दाम्पत्य होय. सुरवातीला पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने सोयाबीनची दुबार पेरणी करण्याची वेळ या दाम्पत्यावर आली. काळ्या आईची दुसऱ्यांदा ओटी भरण्यासाठी पत्नीने चक्क औत ओढले तर पतीने चाढ्यावर मूठ ठेवून पेरणी केली. याचा व्हीडिओ "ई-सकाळ' व "ई-सकाळ' फेसबुक पेजवर चांगलाच व्हायरल होत आहे. 

बातमी व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी या वृद्ध दाम्पत्याची भेट घेऊन चौकशी केली. ढेकणे दाम्पत्याला राहण्यासाठी पक्के घर नसल्याने घरकुल योजनेच्या संदर्भाने गटविकास अधिकारी शेखर सावंत यांना निर्देश दिले. तसेच अंत्योदय अन्नधान्य योजनेअंतर्गत त्यांच्याकडे धान्य सुपूर्द केले. प्रशासनाच्या वतीने शासकीय अवजारांचा लाभ देण्यासंदर्भात विचारणा केली असता नरहरी ढेकणे यांनी आपण अवजारे वापरण्यासाठी शारीरिक दृष्टीने असक्षम असल्याचे सांगितले. वयोवृद्ध जोडप्याला या वयात अंगमेहनतीचे काम करावे लागणे दुर्दैवी असल्याची भावना या वेळी शेलार यांनी व्यक्त केली. या वेळी कृषी सहाय्यक संभाजी पाटील, पोलिस पाटील गणेश मसाळ, माणिक गाडे उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com