तहसिलदारांची प्रांताधिकाऱ्यांविरुध्द विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार ! बार्शीचे बदलले मुख्य निवडणूक निरीक्षक 

तात्या लांडगे
Wednesday, 13 January 2021

जिल्ह्यातील पहिलाच प्रकार... 
तहसिलदारांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार देण्याचा प्रकार मागील काही वर्षांत प्रथमच घडला आहे. प्रांताधिकारीच पदाचा गैरवापर करु लागल्याची तक्रार बार्शीचे तहसिलदार प्रदिप शेलार यांनी थेट विभागीय आयुक्‍तांकडेच केली. तत्पूर्वी, त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजात पदाचा गैरवापर करणाऱ्या निकम यांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत विभागीय आयुक्‍त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : बार्शी तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. परंतु, निवडणूक निरीक्षक पदी असताना निकम यांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार तहसीलदार प्रदीप शेलार यांनी विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्‍तांनी निकम यांना त्या पदावरून हाकलून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांची नेमणूक केली आहे.

जिल्ह्यातील पहिलाच प्रकार... 
तहसिलदारांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुध्द तक्रार देण्याचा प्रकार मागील काही वर्षांत प्रथमच घडला आहे. प्रांताधिकारीच पदाचा गैरवापर करु लागल्याची तक्रार बार्शीचे तहसिलदार प्रदिप शेलार यांनी थेट विभागीय आयुक्‍तांकडेच केली. तत्पूर्वी, त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामकाजात पदाचा गैरवापर करणाऱ्या निकम यांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत विभागीय आयुक्‍त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्‍ती केलेल्या हेमंत निकम यांची त्या पदावरुन हाकलपट्टी केल्यानंतरही निकम यांना नुतन मुख्य निवडणूक निरीक्षक अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना मदत करण्याचे आदेशही विभागीय आयुक्‍तांनी दिले आहेत. जिल्ह्यात 15 जानेवारीला 658 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने आदर्श कार्यपद्धती अवलंबून बदल सुचविले आहेत. त्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायती संख्या 100 पेक्षा अधिक आहे, अशा जिल्ह्यांत संबंधित विभागीय आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार योग्य त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची निवडणूक निरिक्षक म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बार्शी तालुक्‍यासाठी हेमंत निकम यांची नेमणूक केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsildar's complaint against Prantadhikari to Divisional Commissioner; Barshi taluka's chief election observer changed