सोलापूरच्या तेजस्विनीचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

विजयकुमार सोनवणे
Wednesday, 4 March 2020

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमास तेजस्विनी यांचे वडील श्री. नारायण सोनवणे उपस्थित होते. तेजस्विनी यांच्या चित्राचे प्रदर्शन आज सायंकाळी  भरविण्यात येणार आहे.

सोलापूर : येथील प्रसिद्ध चित्रकार  तेजस्विनी नारायण सोनवणे यांना राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज बुधवारी ललित कला अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. दोन लाख रुपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 

नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमास तेजस्विनी यांचे वडील श्री. नारायण सोनवणे उपस्थित होते. तेजस्विनी यांच्या चित्राचे प्रदर्शन आज सायंकाळी भरविण्यात येणार आहे.

महावितरणमधील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांच्या त्या कन्या आहेत. तेजस्विनी सोनवणे यांना उत्कृष्ट कलाकृतीबद्दल 2005 पासून तीन वेळा कोरसाला वंडर आर्ट (इंटरनॅशनल) हैदराबाद या संस्थेकडून सुवर्णपदक मिळाले आहे. "अवंतिका' नवी दिल्ली या संस्थेनेही 2006 मध्ये तिला सुवर्णपदकाने गौरविले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील चित्रकला प्रदर्शन, स्पर्धेत तिने बक्षिसे पटकाविली आहेत. 

तेजस्वीनी यांनी भारती विद्यापीठ फाईन आर्ट महाविद्यालय (पुणे) येथून बॅचलर ऑफ फाईन आर्ट या चित्रकला पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला. त्या सोलापुरातील अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातून जीडी आर्टची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. दक्षिण कोरिया येथील बुसान शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्ट फेअरमध्ये सोलापूरची तेजस्विनी सोनवणेचा सहभाग होता. तेजस्विनीने कर्मवीर अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातून शिक्षण घेतले. पुणे येथील भारती विद्यापीठात पदवीचे तर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून मास्टर ऑफ फाईन आर्टचे शिक्षण तेजस्विनीने घेतले आहे. 2015 मध्ये प्रफुल्ला डहाणूकर फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व 50 हजारांचे रोख बक्षिस तेजस्विनीने पटकाविले होते. बॉम्बे आर्ट गॅलरी मुंबई, संस्कृती आर्ट गॅलरी पुणे येथे तेजस्विनीच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच भारतातील पटना, दिल्ली, कोलकता, मुंबई, भुवनेश्‍वर, खजुराहो येथील चित्र प्रदर्शनात तेजस्विनीचा सहभाग होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswini of Solapur (maharashtra) honors by President of india