दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी व शिक्षकांची लागणार कसोटी ! पालकांनाही लागली काळजी 

राजाराम माने 
Friday, 22 January 2021

दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया खंडित झाल्याने विद्यार्थी - शिक्षक प्रत्यक्ष संवाद थांबला होता. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून काही वर्ग सुरूही झाले. दहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन महिन्यांत कसा पूर्ण होणार, असा प्रश्न असतानाच परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. 

केत्तूर (सोलापूर) : जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शासनाच्या नियमानुसार काही अंशी शाळा दोन महिन्यापूर्वी सुरू झाल्या आणि लगेच आता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिलपासून तर बारावीच्या परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. आता तीन महिन्यांवर परीक्षा आल्यानंतर एवढ्या कमी कालावधीत अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांना पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. 

कोरोना महामारीमुळे यावर्षी शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षक वर्गाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले होते. परंतु, या ऑनलाइन वर्गाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना म्हणावा तसा फायदा झालाच नाही. 23 नोव्हेंबरपासून शाळांचे काही वर्ग सुरू झाले. शासनाच्या धोरणामुळे 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. 

दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया खंडित झाल्याने विद्यार्थी - शिक्षक प्रत्यक्ष संवाद थांबला होता. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून काही वर्ग सुरूही झाले. दहा महिन्यांचा अभ्यासक्रम तीन महिन्यांत कसा पूर्ण होणार, असा प्रश्न असतानाच परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून अभ्यास करावा व परीक्षेला सामोरे जावे, असे केत्तूर (ता. करमाळा) येथील नेताजी सुभाष विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. शिंदे यांनी सांगितले. 

कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे. शासनाच्या धोरणानुसार ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामीण भागात मोबाईल रेंजच्या कमतरतेमुळे या शिक्षणाला बराच ब्रेक लागला होता. 23 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होऊन शिकवण्याला सुरवात झाली आहे. तरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र म्हणावी तशी नव्हती. 
- आबा दूधभाते, 
शिक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension between students and teachers has increased due to the announcement of tenth and tewelth exams