ठाकरेंचा पवारांना, पवारांचा पालकमंत्री भरणेंना "दे धक्का' 

प्रमोद बोडके
Sunday, 18 October 2020

अजित पवारांचा पहिला फोन आमदार संजय शिंदे यांना 
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अचानकपणे सोलापूरच्या दौऱ्यावर आले. मी तुझ्याकडे येतोय असा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनाच दिल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. सोलापूरच्या या दौऱ्याची सुरवातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नगोर्ली (ता. माढा) येथील फार्महाऊस येथून केली. त्यानंतर आमदार संजयमामा शिंदे हे शेवटपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत होते. 

सोलापूर : कोरोनाच्या मृत्यू दरामुळे चर्चेत आलेला सोलापूर जिल्हा आता अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्याच्या नकाशावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी अचानक सोलापूरचा दौरा केला. दौरा करुन मदतीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारचा (ता. 19) सोलापूर दौरा जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्याची कल्पना पालकमंत्री दत्तात्रेयमामा भरणे यांच्यापूर्वी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांना मिळाल्याने अजित पवारांच्या दे धक्का राजकारणाची चर्चा आता रंगू लागली आहे. 

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या सोमवारी (ता. 19) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हे विशेष. राज्यावर आलेले कोरोनाचे संकट असो की निसर्ग वादळाचे संकट. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसूनच राज्याचा कारभार बघतात असा आरोप सातत्याने भाजपच्यावतीने केला जात आहे. सोलापूरसह शेजारच्या जिल्ह्यांमध्ये नुकतेच अतिवृष्टीचे संकट येऊन गेले आहे. या संकटाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचू लागले आहेत. आपल्यावर होत असलेल्या आरोप खोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्‍याची निवड केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात असलेल्या या अक्कलकोट तालुक्‍यात शिवसेना नाममात्र आहे. या मतदारसंघातून सातत्याने कॉंग्रेस व भाजपचाच आमदार निवडून येत आहे. तरी देखील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोटची निवड का केली? असाच प्रश्‍न सर्वांना पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शनिवारच्या सोलापूर दौऱ्याची कल्पना प्रशासनातील मोजके अधिकारी वगळता इतर कोणालाही देण्यात आली नव्हती. माढा, पंढरपूर तालुक्‍यात अजित पवारांनी शनिवारी दिवसभर पाहणी केली. नुकसानीचा आढावा घेतला. सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या घरी सांत्वनपर भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी सात वाजता सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

दिवसभर पाहणी केल्यानंतर सायंकाळच्या पत्रकार परिषदेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार काहीतरी घोषणा करणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्याची बातमी मुख्यमंत्री संपर्क कार्यालयाच्यावतीने बाहेर पडली. मुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर येत असताना उपमुख्यमंत्र्यांनी मदतीच्या पॅकेजची घोषणा करणे योग्य होणार नाही असे सांगून अजित पवार यांनी फक्त सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती पत्रकार परिषदेत सांगितली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा संपूर्ण विषय हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोपविला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सोलापूर दौऱ्याचा जसा सर्वांना धक्का बसला. तसाच धक्का अजित पवारांच्या सोलापूर दौऱ्याचा बसला. शनिवारी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मोहोळ, अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी करत होते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर व माढा भागातील दौऱ्याला सुरुवात केली. अजित पवार यांच्या या अचानक दौऱ्याची कल्पना पालकमंत्र्यांनाही नसल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray's push to Pawar, Pawar's push to bharne Guardian Minister