...तर देशात भूकबळी अन् बेरोजगारी वाढेल

तात्या लांडगे
बुधवार, 22 एप्रिल 2020

बेरोजगारी ही देशातील प्रमुख समस्या
लॉकडाउनमुळे एकट्या महाराष्ट्राची पावणेतीन लाख कोटींची उलाढाल ठप्प झाली असून देशाच्या उलाढालीचा आकडा खूप मोठा आहे. दुसरीकडे हातावरील पोट असलेल्यांची संख्याही आपल्या देशात मोठी असून बेरोजगारी ही देशातील प्रमुख समस्या मानली जाते.

सोलापूर : गर्दीतून वाढणाऱ्या कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने संपूर्ण देश लॉकडाउन झाला आणि १४ एप्रिलपर्यंतचा लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. तरीही महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दररोज ४०० ते ५५० च्या सरासरीने वाढत आहे. हे सगळे जागेवर थांबवून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सरकारने वरील सहा उपायांच्या माध्यामातून कार्यवाही केल्यास कोरोना काही दिवसांत हद्दपार होईल, असा विश्वास वाटतो.

कोरोना या विषाणूची रुग्णसंख्या आपल्या राज्यात व देशात अन्य देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. तर विषाणूला हरवून सुखरूप घरी परतणारेही लक्षणीय आहेत. मात्र, महिन्याच्या लॉकडाउनमुळे एकट्या महाराष्ट्राची पावणेतीन लाख कोटींची उलाढाल ठप्प झाली असून देशाच्या उलाढालीचा आकडा खूप मोठा आहे. दुसरीकडे हातावरील पोट असलेल्यांची संख्याही आपल्या देशात मोठी असून बेरोजगारी ही देशातील प्रमुख समस्या मानली जाते. तर महाराष्ट्र  सरकारचीच नव्हे तर केंद्र सरकारचीच आर्थिक स्थिती बिकट असल्याने सर्वसामान्य गोरगरिबांना पुरेशी मदत करण्याचा सरकारचा प्रामाणिक हेतू असूनही मदत करण्यास सरकार हतबल असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने आता सुरक्षित शहरांमधील लॉकडाउन टप्याटप्प्याने शिथिल करून काही प्रमाणात उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, मालवाहतूक (जीवनाश्यक वस्तू) सुरु केली व टोल वसुलीला पुन्हा मान्यता दिली. तरीही कोरोनाचे संकट कायम असून मागील काही दिवसात रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ते प्रमाण रोखण्यासाठी वरील सहा उपाययोजनांची ठोस अंमलबजावणी करणे फार गरजेचे वाटते. जेणेकरून सर्वजण सुरक्षित होतील व व्यवहार टप्याटप्याने सुरू होऊन कोरोनामुळे संबंध देशाला पडलेला लॉकडाउनचा विळखा सुटेल आणि सर्वकाही सुरळीत होईल. 

हे आहेत सहा उपाय....
​१) खासगी व सरकारी डॉक्टरांच्या माध्यमातून घरोघरी करावे कोरोना सर्वेक्षण; माहिती लपवणारे अथवा खोटी माहिती देणाऱ्यांवर करावी कारवाई

२) प्रत्येक डॉक्टरांच्या मदतीला एनएचएम, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व प्राथमिक, माध्यमिकच्या शिक्षकांची करावी नियुक्ती ; जेणेकरून घरोघरी वाढणारे रुग्ण कमी होतील

३) सर्वेक्षण करणाऱ्यांपैकी कोरोनाबाधित परिसरात जाणाऱ्यांना द्यावेत पीपीई कीट अन् एन-९५ मास्क; अन्य भागात जाणाऱ्यांना अन्य कीट व दर्जेदार मास्क द्यावे, जेणेकरुन विषाणूविरुद्ध लढणारे सैनिक राहतील सुरक्षित

४) घराच्या दरवाजातून नव्हे तर घरात जाऊन फॅमिली डॉक्टरांप्रमाणे प्रत्येकाची करावी तपासणी; विशेषत: ज्या भागात दवाखाना आहे, त्या डॉक्टरांकडे तो परिसर द्यावा अन् मदतीला गरजेनुसार पोलीस ठेवावा

५) मुबलक डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांमुळे किमान १५ ते २० दिवसांत होईल सर्वांची तपासणी; लक्षणे असलेल्यांची होईल पडताळणी अन् संशयितांची १४ दिवसांनंतर करावी घरी रवानगी

६) दवाखाने उघडे ठेवायचे आदेश असतानाही बहूतांश खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे सर्वेक्षण केल्याने खासगी डॉक्टर्सना सरकारने द्यावी ठरावीक रक्कम ; सर्वेक्षणानंतर लगेचच ज्या भागात रुग्ण सापडेल त्या टीमवर करावी कारवाई

... तर भूकबळी अन् बेरोजगारी वाढेल
११३ कोटी लोकसंख्येच्या कृषीप्रधान देशात मजूर अन् हातावरील पोट असलेल्यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक तरुण असलेला देश म्हणून ओळख असलेल्या देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. दुसरीकडे काम केल्याशिवाय कुटुंबाच्या पोटाची खळगी भरत नाही, अशा हातावर पोट असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे. तर बँका, फायनान्स कंपनी, खासगी सावकार  आणि पै- पाहूण्यांकडून कर्ज घेऊन शेती पिकवणारा शेतकरी एक महिन्यापासून चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेला शेतमाल फेकून द्यावा लागला. दरम्यान, कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्याची खरी गरज नव्हती. कारण, कोरोनामुळे मरणाऱ्यांच्या अथवा मृत झालेल्यांच्या तुलनेत आपल्या देशात भूकबळी, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता लॉकडाउन उठला नाहीतर, अनेकांचे रोजगार जातील, हातावरील पोट असलेल्यांना दोन वेळचे पोटभर जेवण मिळणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे महसूलात घट होणार असल्याने भांडवली कामांना मोठ्या प्रमाणावर ब्रेक लावून जमा महसुलातून फक्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगारीच कराव्या लागतील, असा अंदाज वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कोरोना घालवण्यासाठी ठोस उपाययोजना करा, मात्र लॉकडाउन उठवावेच लागेल. अन्यथा जागतिक महासत्तेकडे वाटचाल करणारा देश दोन-तीन वर्षे मागे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: then there will be hunger and unemployment in the country