कौटुंबिक तक्रारींत मोठी वाढ ! माहेरी गेलेली बायको आता म्हणते सासरी नको

​तात्या लांडगे
Sunday, 27 September 2020

लॉकडाउन काळात पतीचा रोजगार गेला, घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे माहेरुन पैसे घेऊन ये म्हणून सासऱ्यांकडून छळ केला जातोय, अशाही तक्रारी महिला सुरक्षा कक्षाकडे (भरोसा सेल) प्राप्त होत आहेत.

सोलापूर : पती काम करत नाही, आर्थिक अडचणींमुळे सासरच्यांकडून त्रास, सासर तथा माहेरच्यांची लुडबूड, पती- पत्नीचे अनैतिक संबंध अशा कारणांमुळे कौटुंबिक वाद वाढत आहेत. विवाहात मानपान व्यवस्थित केला नाही, माहेरुन पैसे आण अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाणही लक्षणीय आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2019 च्या तुलनेत यंदा तक्रारींचे प्रमाण खूपच वाढले आहे. मागील वर्षी 276 तक्रारी होत्या, तर यंदा 334 तक्रारी महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे प्राप्त झाल्या आहेत.

लॉकडाउन काळात पतीचा रोजगार गेला, घरातील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे माहेरुन पैसे घेऊन ये म्हणून सासऱ्यांकडून छळ केला जातोय, अशाही तक्रारी महिला सुरक्षा कक्षाकडे (भरोसा सेल) प्राप्त होत आहेत. पती किंवा पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, सासू, सासरे, नणंद, दिर त्रास देतात. तर प्रसुतीसाठी माहेरी गेलेली पत्नी मला माहेरी राहायला ये म्हणते अशा तक्रारीही पतीकडून केल्या जात आहेत.

तसेच सुनेने कान भरल्याने मुलगा आम्हाला सांभाळत नाही, अशा पालकांच्याही तक्रारी भरोसा सेलकडे येत आहेत. या तक्रारी तडजोडीतून मिटविण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या माध्यमातून सुरु आहे. तडजोडीने न मिटणारी प्रकरणे न्यायालयात तथा संबंधित पोलिस ठाण्यांकडे वर्ग केले जात आहेत.

संसार जोडण्यात 'यांचा' मोलाचा वाटा

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस उपनिरीक्षक ज्योती कडू, सहायक पोलिस निरीक्षक करुणा चौगुले, पोलिस हवालदार पिरप्पा उटगे, जाकीर पटेल, संतोष लवटे, सिंधू थोरात, ज्योती लांबतुरे, अनिस दलाल, वैशाली एकेली, वनिता शिंदे, अरुणा परब आणि स्मिता गवंडी.

संघर्ष मिटविण्यासाठी नातेवाईकांना 'भरोसा'चा दिलासा

माहेरी गेलेली पत्नी सासरी येत नाही.सासू, सासरे, नणंद, आई, वडिल, बहिणीची संसारात लूडबूड यासह अन्य प्रकारच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. त्यातून पती- पत्नींचा संसार मोडू नये, तो सुरळीत व्हावा यासाठी महिला सुरक्षा विशेष कक्षातर्फे त्यांना समुपदेशन करुन भांडण मिटवण्याचा प्रयत्न यशस्वीपणे सुरु असल्याचे महिला सुरक्षा विशेष कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले. 

कौटुंबिक वादाच्या तक्रारी

जानेवारी ते ऑगस्ट (2019)              -  276
जानेवारी ते ऑगस्ट (2020)              -  334
आपसात तडजोड (2019)                -  185
जडजोडीने मिटलेली भांडणे (2020)   -  111

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There has been a huge increase in family complaints to the Womens Safety Special Unit this year