सोलापुरांनो घाबरु नका ! सोलापुरात कोरोनाबाधित रुग्ण नाहीच 

तात्या लांडगे
बुधवार, 8 एप्रिल 2020

जिल्हाधिकारी म्हणाले... 

  • मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवाशी 31 मार्चलाच सोलापुरातून परतला आहे 
  • 6 एप्रिलला तो त्याठिकाणी कोरोनाबाधित असल्याचे मध्यप्रदेशातून समजले 
  • दक्षिण सोलापुरातील वांगीजवळील ठेंगेवाडी केली सील 
  • बेदाणा कारखान्यावर काम करणाऱ्या 35 जणांना घेतले ताब्यात 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वांगीजवळील ठेंगेवाडी येथील बेदाणा कारखान्यावर काम करणारा मध्यप्रेदशातील कामगार 31 मार्चला ग्वाल्हेरला परतला आहे. 6 एप्रिलला तो त्याठिकाणी कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे सोलापुरात कोणताही कोरोनाबाधित रुग्ण नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. 

सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत पडताळणी केलेले सर्व संशयीतांचे नमुने निगेटिव्ह आढळलेले आहेत. सोलापूर अद्यापही कोरोनापासून दूर असून नागरिकांनी त्यासाठी मोलाचे सहकार्य करीत खबरदारी घेतली आहे. दक्षिण सोलापुरातील वांगीजवळील ठेंगेवाडी येथील बेदाणा कारखान्यावर तो तरुण कामाला होता. तो 31 मार्चला गावी परतला असून त्याठिकाणी तो पॉझिटिव्ह आढळला आहे. सोलापुरात अद्यापही एकही रुग्ण नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

ठेंगेवाडी संपूर्णपणे केली सील 
वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ठेंगेवाडी येथील बेदाणा कारखान्यावर काम करणारा तरुण लॉकडाउननंतर 31 मार्चला वाहनाने मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरला परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या बेदाणा कारखान्यावरील 35 जणांना ताब्यात घेतले असून त्यांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले आहेत. तर ठेंगेवाडी संपूर्णपणे सील केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सकाळ शी बोलताना दिली. 

रुग्ण सापडल्याची अफवा 
सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. ग्वाल्हेरचा तरुण याठिकाणाहून गेल्यानंतर 6 एप्रिलला तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, खबरदारी म्हणून आपण वैद्यकीय पथक नियुक्‍त करुन ठेंगेवाडीत ठेवले आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची अफवा असून नागरिकांनी घाबरण्याची आवश्‍यकता नाही. परंतु, सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no coronary artery disease in Solapur