esakal | "गुंडांनो, गुन्हेगारांनो सावधान ! मस्ती केली तर सोडणार नाही'; सांगोला पोलिसांनी लावलेल्या फलकाची होतेय चर्चा

बोलून बातमी शोधा

Sangola Police}

सांगोला पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगोला शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातही मोठे फलक लावून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी सुरवातीलाच तयार केलेली वातावरण निर्मिती, आपली केलेली वेगळी ओळख शेवटपर्यंत टिकावी, तालुक्‍यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा व तालुक्‍यात असणाऱ्या विविध अवैध धंद्यांना चाप बसावा, फक्त नव्याची नवलाई होऊ नये अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. 

solapur
"गुंडांनो, गुन्हेगारांनो सावधान ! मस्ती केली तर सोडणार नाही'; सांगोला पोलिसांनी लावलेल्या फलकाची होतेय चर्चा
sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगोला शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भागातही मोठे फलक लावून नागरिकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस पाटील, पत्रकार, ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावून विविध सूचना दिल्या आहेत. या बैठकांमुळे व लावण्यात आलेल्या फलकांबाबत सर्वत्र चर्चा सुरू असली, तरी त्यांनी सुरवातीलाच तयार केलेली वातावरण निर्मिती, आपली केलेली वेगळी ओळख शेवटपर्यंत टिकावी, तालुक्‍यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा व तालुक्‍यात असणाऱ्या विविध अवैध धंद्यांना चाप बसावा, फक्त नव्याची नवलाई होऊ नये अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. 

सांगोला पोलिस ठाण्यात नुकतेच अकलूजहून पोलिस निरीक्षक म्हणून भगवान निंबाळकर रुजू झाले आहेत. रुजू झाल्यापासून विविध संघटना, पदाधिकारी, पोलिस पाटील, नूतन ग्रामपंचायत सदस्य व इतर अधिकारी व गाव प्रमुखांबरोबर बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. या बैठकांमध्ये त्यांनी उपस्थितांना शहर व तालुक्‍यातील शांतता टिकवण्यासाठी, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी विविध सूचना व आदेश देत आहेत. बैठकांबरोबरच पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी अनेक शहर व तालुक्‍यांत डिजिटल बोर्ड बनवले असून, महत्त्वाच्या ठिकाणी ते बोर्ड लावण्यात आले आहेत. याबाबत सामान्य नागरिकांनाही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रुजू झाल्यापासून निंबाळकरांच्या बैठकांची व लावलेल्या फलकांची चर्चा सर्वत्र होत आहे. 

सुरवातीलाच त्यांची वेगळी ओळख तालुक्‍यात निर्माण झाली असली, तरी या अगोदरही अनेक अधिकाऱ्यांनी सुरवातीला काही कारणांसाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, परंतु काही दिवसांनी ती ओळख तशी दिसलीच नाही. त्याचप्रमाणे सध्या रुजू झालेले भगवान निंबाळकर यांनी आपली केलेली ओळख निर्मिती कायम टिकवावी, तालुक्‍यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, अवैद्य धंदे बंद व्हावेत अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. 

मस्ती केली तर सोडणार नाही 
सध्या शहर व तालुक्‍यातील प्रत्येक गावांत पोलिस ठाण्याच्या वतीने डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. या डिजिटल बोर्डवर नागरिकांसाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये गुंडांना सावधान होण्याचा इशारा दिला असून तसेच दमदाटी, फसवणूक, लुबाडणूक, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे, गोंधळ घालणे व वाहतुकीसंदर्भातील नियम व सूचना फलकावर लिहिल्या आहेत. तसेच शेवटी "गुंडांनो, गुन्हेगारांनो सावधान ! मस्ती केली तर सोडणार नाही' असे मोठ्या अक्षरांत लिहिले असल्याने याबाबतही सर्वत्र चर्चा होत आहे. 

सुरवातीची वातावरण निर्मिती शेवटपर्यंत टिकावी 
या अगोदरही तालुक्‍यात आलेल्या काही अधिकाऱ्यांनी नवीन असताना मोठ्या वल्गना केल्या होत्या. सुरवातीच्या काही दिवसांत नियमांचे काटेकोर पालन केले जात होते. अवैध धंद्यांनाही मोठ्या प्रमाणात आळा बसविला होता. परंतु सुरवातीचे नव्याचे नऊ दिवस गेल्यानंतर पूर्वापार सर्व अवैद्य धंदे सुरू होताना दिसले. यामुळे निंबाळकरांनी केलेली वातावरण निर्मिती शेवटपर्यंत टिकवून ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

बैठका घेणे, सूचना फलक लावणे हे प्रसिद्धीसाठी केले नसून, तालुक्‍यातील सामान्य नागरिकांवर अन्याय होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. जोपर्यंत तालुक्‍याचा पदभार माझ्याकडे आहे तोपर्यंत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. परंतु शांतताप्रिय तालुक्‍यात कोणी दंगामस्ती, चोरी, फसवणूक व इतर अवैध उद्योग करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशांना मी कधीही सोडणार नाही 
- भगवान निंबाळकर, 
नूतन पोलिस निरीक्षक, सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल