esakal | पंढरपुरात वाढणार अतिरिक्त 120 बेड ! चार डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये होणार सोय

बोलून बातमी शोधा

Hospital.

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपुरात सध्या सुरू असलेल्या चार डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त एकूण 120 बेडची क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. 

पंढरपुरात वाढणार अतिरिक्त 120 बेड ! चार डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये होणार सोय
sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपुरात सध्या सुरू असलेल्या चार डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त एकूण 120 बेडची क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. 

तालुक्‍यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी श्री. ढोले यांनी पंढरपूर नगरपरिषदेत शहरातील खासगी डॉक्‍टर व ऑक्‍सिजन पुरवठाधारक यांची बैठक घेतली. बैठकीस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरपालिकेचे डॉ. बी. के. धोत्रे, डॉ. संभाजी भोसले, गणपती हॉस्पिटलचे डॉ. कारंडे, गॅलॅक्‍सी हॉस्पिटलचे डॉ. गुजरे, डॉ. सूरज पाचकवडे, अपेक्‍स हॉस्पिटलचे डॉ. आरिफ बोहरी, लाईफ लाइन हॉस्पिटलचे डॉ. संजय देशमुख उपस्थित होते. 

श्री. ढोले म्हणाले, रुग्णालयांना ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत सुरू राहील, तसेच रुग्णालयात वेळेत ऑक्‍सिजन प्राप्त होईल याची दक्षता ऑक्‍सिजन पुरवठादाराने घ्यावी. यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहावे. कोव्हिड केअर सेंटर येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधेसाठी निमा संघटनेतील डॉक्‍टरांची मदत घेऊन होम आयसोलेशनची सुविधा निर्माण करावी. होम आयसोलेशनमध्ये असलेले नागरिक बाहेर फिरणार नाहीत याची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खासगी व शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, प्रशासन यांनी एकात्मिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

चार डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त 120 बेडच्या क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी आवश्‍यक कागदोपत्री प्रक्रिया करून कार्यवाही करावी. लाईफ लाइन हॉस्पिटलने पोलिस प्रशासनातील अधिकारी - कर्मचारी यांच्या उपचारासाठी प्रस्तावित केलेल्या जागेत डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल तत्काळ कार्यान्वित करावे. शहरातील लॅबधारकांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटीपीसार तपासणीचे दर शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमानुसार घ्यावेत. त्याबाबत दरपत्रक दर्शनी भागावर लावावे. डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलचे फायर ऑडिट व इलेक्‍ट्रिसिटी ऑडिट संबंधित रुग्णालयांनी करून घ्यावे. याबाबत रुग्णालयांची तपासणी नगर पालिका प्रशासनाने करून घ्यावी, अशा सूचनाही श्री. ढोले यांनी या वेळी दिल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल