सोलापुरात भर दुपारी घर फोडले; दोन लाख दहा हजाराची चोरी

तात्या लांडगे
Sunday, 18 October 2020

अधिक महिन्यानिमित्त आईच्या घरी जेवायला गेल्यानंतर चोरट्याने घर फोडून दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (ता. 15) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

सोलापूर : अधिक महिन्यानिमित्त आईच्या घरी जेवायला गेल्यानंतर चोरट्याने घर फोडून दोन लाख दहा हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना गुरुवारी (ता. 15) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी सविता चंद्रकांत बिराजदार (रा. माकणे अपार्टमेंट, मित्रनगर) यांनी जोडभावी पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक महिना सुरु असल्याने आईने जेवायला घरी बोलावले होते. आईकडे जेवायला जाण्यासाठी घराला कुलूप लावून सविता बिराजदार आईकडे गेल्या. ही संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील तिजोरीतून रोकड लंपास केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. दाईंगडे हे करित आहेत.

रिक्षा प्रवासात महिलेने पळविली रोख रक्कम

सोलापूर : रिक्षातून प्रवास करताना एका व्यक्तीच्या बॅगेतून रोख रक्कम चोरून महिला पसार झाली आहे. टिळक चौक ते एलआयसी ऑफिस, एम्प्लॉयमेंट चौक दरम्यान ही घटना घडल्याची फिर्याद राजशेखर सिद्धेश्‍वर नष्टे (रा. शुक्रवार पेठ, महालक्ष्मी हाईट्‌स) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली आहे. रिक्षातून प्रवास करताना शेजारी तीन महिला बसल्या होत्या. त्यातील एका महिलेने बॅगची चैन नकळत उघडून 43 हजार दोनशे रुपयांची रोकड लंपास केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा

सोलापूर : अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रफिक इस्माईल जमगे (रा. आझाद नगर, जळकोट, ता.तुळजापूर) याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑक्‍टोबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास केगाव (ता. उत्तर सोलापूर) ब्रिज परिसरात झालेल्या अपघातात योगेश काशिनाथ लटके (रा. आवसे वस्ती, आमराई) यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, या अपघातात योगेशच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान योगेश यांचा मृत्यू झाला. रफिकने त्याच्या ताब्यातील ट्रक हलगर्जीपणाने व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याची फिर्याद योगेशचा भाऊ युवराज काशिनाथ लटके यांनी दिली आहे.

मालट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

सोलापूर : मालट्रकने दुचाकी धडक दिल्यानंतर या अपघातात संदीप सिताराम गडदे (वय 22) आणि त्याचा मित्र नितीन बापू थोरात (वय 23) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. संदीप आणि नितीन हे दोघे त्यांच्याकडील दुचाकीवरुन (एमएच- 13, डीजे- 7404) हैदराबाद ते सोलापूर रस्त्यावरून घराकडे जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या मालट्रकने (टीएन- 52, एनएस- 2917) जोरात धडक दिली. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कार्तिक इ. ईश्‍वरमूर्ती (रा. पटीपाडी, यरकड, तामिळनाडू) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिताराम पांडूरंग गडदे (रा. वडजी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

हॉटेल चालकाच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा

सोलापूर : दहा ते बारा टॅंकरचालकांना ग्राहक म्हणून हॉटेलमध्ये आणतो, असा विश्‍वास संपादन करून हॉटेल चालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुध्द फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत चंद्रकांत बाबर (रा. गणपती मंदिराजवळ, शिवाजी नगर, बाळे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. बाबर यांचे शिवाजी नगर येथे समर्थ खानावळ आहे. दरम्यान, मी देगाव येथे राहतो, सोनाई दुधाचे टॅंकरचालक माझ्या ओळखीचे असून त्यांना हॉटेलमध्ये ग्राहक म्हणून आणतो, असे सांगून बाबर यांचा त्या व्यक्‍तीने विश्‍वास संपादन केला. त्यानंतर बाबर यांनी त्या व्यक्‍तीला घरी जाऊन येण्यासाठी त्यांच्याकडील दुचाकी (एमएच- 13, बीए- 0807) दिली. मात्र, तो परत आलाच नाही. त्यानंतर बाबर यांनी त्या व्यक्‍तीविरुध्द पोलिसांत धाव घेतली. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A thief has stolen Rs two lakh from a house in Solapur city and fled