
टेंभुर्णी शहरातील मार्केट यार्डमधील विठ्ठल बझार, विठ्ठल इंडेन गॅस एजन्सी ऑफिस व अन्य पंधरा दुकानांतून अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून सुमारे 3 लाख 23 हजार रुपये चोरून नेले. गेल्या दोन दिवसांपासून या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी शहरातील मार्केट यार्डमधील विठ्ठल बझार, विठ्ठल इंडेन गॅस एजन्सी ऑफिस व अन्य पंधरा दुकानांतून अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून सुमारे 3 लाख 23 हजार रुपये चोरून नेले. गेल्या दोन दिवसांपासून या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवशी टेंभुर्णी शहरातील पंधरा ते वीस एवढ्या मोठ्या संख्येने दुकानांचे शटर उचकटून चोरीच्या घटना घडल्याने टेंभुर्णी शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून, काही दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी, की टेंभुर्णी येथील मार्केट यार्डमध्ये विठ्ठल मध्यवर्ती ग्राहक भांडारमार्फत विठ्ठल बझार हे दुकान चालविण्यात येते. मंगळवारी सायंकाळी सात वाजता विठ्ठल बझारचे व्यवस्थापक गजानन औदुंबर तोडकर (वय 52, रा. अकोले खुर्द, ता. माढा) व अन्य सहकारी नेहमीप्रमाणे विठ्ठल बझार बंद करून घरी गेले होते. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला. विठ्ठल बझार व विठ्ठल इंडेन गॅस एजन्सी ऑफिसमधील कपाट उचकटून चोरट्यांनी विठ्ठल बझारचे दिवसभर विक्रीतून आलेले 1 लाख 40 हजार रुपये व इंडेन गॅस एजन्सी या दुकानातून गॅस विक्रीतून आलेले 86 हजार रुपये असा एकूण 2 लाख 26 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी व्यवस्थापक गजानन तोडकर यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरीच्या तपासासाठी सोलापूरहून श्वानपथक मागविण्यात आले होते, परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री देखील चोरट्यांनी विठ्ठल बझारचे शटर उचकले, मात्र चोरी केली नाही.
गुरुवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी मार्केट यार्डमथील दुर्गा मशिनरी या दुकानाचे शटर उचकटून 57 हजार रुपये, स्वामी समर्थ वे ब्रीजमधील दोन हजार 200 रुपये, ओम मोटर्स अँड ऑटोमोबाईलमधून 15 हजार 700 रुपये, तिरुमला व्हील अलायमेंट या दुकानातून 2 हजार 300 रुपये तसेच विठ्ठल कुबेर यांच्या तरकारी दुकानातून 22 हजार रुपये असे एकूण 3 लाख 23 हजार रुपये लंपास केले. गुरुवारी रात्री मार्केट यार्डमधील शिव एंटरप्रायझेस, श्री दत्त मशिनरी, अथर्व मशिनरी, स्वामी समर्थ गॅस सर्व्हिस सेंटर, उत्कर्ष हार्डवेअरचे गोदाम, अथर्व ऍग्रो एजन्सी, धनलक्ष्मी ऍग्रो, दीपरत्न ऍग्रोटेक, स्वामी समर्थ वे ब्रीज, विठ्ठलराव कारखाना कार्यालय, शिवतेज ऍग्रो, अनिकेत ऍग्रो आदी दुकानांचे शटर चोरट्यांनी एकाच रात्री उचकटले. काही दुकानदारांची किरकोळ रक्कम चोरीला गेल्याचे समजते. याप्रकरणी दुकानदार गणेश क्षीरसागर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस पथक नियुक्त केले असून, कसून तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले हे तपास करीत आहेत.
संपादन : श्रीनिवास दुध्याल