बार्शीत गोदामातून सहा लाख रुपयांच्या सोयाबीनची चोरी ! पाच संशयितांना अटक; नऊ जणांवर गुन्हा दाखल 

प्रशांत काळे 
Wednesday, 20 January 2021

रविवारी तालुका पोलिस ठाण्याची रात्रीची गस्त सुरू असताना पोलिसांनी एमएच 12 एमव्ही 3844 हा ट्रक पकडला होता व कागदपत्रांची तपासणी केली होती. पण सोयाबीन खरेदीची कागदपत्रे नसल्याने ट्रक पोलिस ठाण्यात आणून ठेवला. गुन्हा दाखल करून पोलिसांनी माहिती घेत पाच जणांना अटक करून इतरांचा शोध सुरू केला असून, पोलिसांनी पकडलेले सोयाबीनचे कट्टे गोदामातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

बार्शी (सोलापूर) : शहरातील तुळजापूर रस्त्यावर असलेल्या विनियोग वेअर हाउसिंग कॉर्पोरेशनच्या गोदामातून 14 हजार किलो वजन असलेले सोयाबीनचे 200 कट्टे (किंमत 5 लाख 60 हजार) ट्रकमधून लंपास करताना पोलिसांनी चोरट्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर नऊ जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 19) सकाळी गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र छगन काळे, बालाजी तानाजी शिंदे, सुनील दादा काळे, शहाजी अरुण शिंदे, अर्जुन सुब्राव शिंदे (सर्व रा. मोहा, ता. कळंब) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर विक्रम वाघमारे (रा. बाभळगाव, ता. कळंब), पिल्या रवी काळे, शंकर शिवराम काळे, बबलू दादा काळे (तिघे रा. मस्सा, ता. कळंब) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कैलास काळबांडे (रा. उल्का नगरी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना रविवारी पहाटे अडीच वाजता घडली. 

राजस्थान गम प्रा. लि. कंपनीसाठी कमोडिटी अल्फा या कंपनीने खरेदी केलेला सोयाबीनचा साठा तुळजापूर रोडवरील विनियोग वेअर हाउसिंग कॉर्पोरेशनचे तीन गोदाम भाड्याने घेऊन ठेवला आहे. कंपनीने गोदामाची तपासणी 21 डिसेंबर 2020 रोजी केली तेव्हा 31 हजार 901 कट्टे (एक कट्टा 70 किलो) होते. सोमवारी सकाळी गोदाम व्यवस्थापक विलास सोमदळे यांचा फोन आला आणि 200 कट्टे गोदामाचे मुख्य शटर तोडून चोरीला गेले असल्याचे सांगितले. गोदामाची तपासणी सुरू असून नेमके किती कट्टे चोरीस गेले आहेत हे पाहिले जात आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

रविवारी तालुका पोलिस ठाण्याची रात्रीची गस्त सुरू असताना पोलिसांनी एमएच 12 एमव्ही 3844 हा ट्रक पकडला होता व कागदपत्रांची तपासणी केली होती. पण सोयाबीन खरेदीची कागदपत्रे नसल्याने ट्रक पोलिस ठाण्यात आणून ठेवला. गुन्हा दाखल करून पोलिसांनी माहिती घेत पाच जणांना अटक करून इतरांचा शोध सुरू केला असून, पोलिसांनी पकडलेले सोयाबीनचे कट्टे गोदामातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves stole soybeans worth Rs six lakh from a warehouse in Barshi