यशवंतभाऊ व राजूबापूंनंतर तिसऱ्या पिढीचे भोसे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व ! विरोधकांची अनामत जप्त 

सुनील कोरके 
Thursday, 21 January 2021

राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर गावातील विरोधकांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यांच्या हाती शेवटपर्यंत काहीच न लागल्याने अखेरच्या टप्प्यात निवडणुकीतून माघार घेणे पसंत केले. तरीही पाच जागांसाठी बाप- लेकांनीच उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक लागली होती. तरीही चार ठिकाणी विरोधकांची अनामत जप्त झाली आहे. 

भोसे (क) (सोलापूर) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुरवातीला 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर सहा उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत विरोधी उमेदवारांची अनामत जप्त केली. भोसे (ता. पंढरपूर) ही ग्रामपंचायत स्थापनेपासून स्व. यशवंतभाऊ व स्व. राजूबापू पाटील यांच्या ताब्यात होती. स्व. राजूबापू पाटील यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जबाबदारी त्यांचे चिरंजीव ऍड. गणेश पाटील यांच्यावर पडली. त्यांना भोसे सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, शहाजी पाटील, शेखर पाटील, धैर्यशील पाटील व स्व. राजूबापू पाटील यांच्या सहकाऱ्यांनी भक्कम साथ दिली. 

गेल्या दहा वर्षांपासून ऍड. गणेश पाटील उपसरपंच म्हणून काम करत आहेत. या कालावधीत वाडी- वस्तीवरील रस्ते, पथदिवे, भुयारी गटार, अंतर्गत रस्ते, दीडशे व्यापारी गाळे आदी विकासकामांसह विविध पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे एकहाती सत्ता कायम आहे. यापूर्वी कै. राजूबापू पाटील यांच्या कालावधीत विरोधी गटाला सत्तेत सामावून घेत दोनवेळा ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. त्या काळात विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक महादेव खटके व दुसरे माजी संचालक बाळासाहेब माळी यांचा प्रबळ विरोधी गट होता. राजूबापू पाटील यांच्याकडे कोणतीही सत्ता नव्हती. संपूर्ण तालुक्‍यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चर्चा होती. असे असतानाही सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून सत्ता ताब्यात ठेवली होती. 

या वेळीही राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर गावातील विरोधकांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यांच्या हाती शेवटपर्यंत काहीच न लागल्याने अखेरच्या टप्प्यात निवडणुकीतून माघार घेणे पसंत केले. तरीही पाच जागांसाठी बाप- लेकांनीच उमेदवारी दाखल केल्याने निवडणूक लागली होती. तरीही चार ठिकाणी विरोधकांची अनामत जप्त झाली आहे. 

विजयी झालेले सहा उमेदवार 
ऍड. गणेश राजूबापू पाटील, भारत किसन जमदाडे, देविदास एकनाथ जमदाडे, तानाजी शिवाजी नाईकनवरे, नामदेव मारुती कोरके, रुक्‍मिणी कृष्णात माळी. 

तिसरी पिढी शरद पवारांच्या विचारांचे पाईक 
कै. यशवंतभाऊ पाटील व कै. राजूबापू पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन सांत्वन केले व चिरंजीव ऍड. गणेश पाटील यांना राजकीय ताकद देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्यांना जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद दिले. त्यानंतर गणेश पाटील यांनी जिल्हाभर दौरे करून युवकांमध्ये चैतन्य आणले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third generation of Patil family Ganesh Patil won the Bhose Gram Panchayat election